Pimpri Corona News : उद्योगांना ऑक्सिजनसाठा पूर्ववत करा; लघुउद्योग संघटनेचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

एमपीसी न्यूज – उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उत्पादकांकडे जवळपास 30 ते 40 टक्के ऑक्सिजनसाठा शिल्लक राहत आहे. त्यामुळे अतिरिक्त असलेला ऑक्सिजनसाठा हा उद्योगांना पूर्ववत सुरु करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड यांनी ऑक्सिजन देण्याची मागणी केली. त्यावर शिल्लक ऑक्सिजन साठ्याचा अहवाल दोन दिवसांत देण्याचे आदेश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

बेलसरे यांनी निवेदनात म्हटले आहे की,पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक व कामगारनगरी म्हणून ओळखली जाते. पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात जवळपास 11 ते 12 हजार लहान मोठे लघुउद्योग कार्यरत आहेत. यापैकी 5 ते 6 हजार उद्योगांना औद्योगीक वापराकरिता ऑक्सिजनची गरज असते. परंतु कोविड 19 ची दुसरी लाट ही मार्च 2021 मध्ये चालू झाली. एप्रिल 2021 मध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याकारणाने औद्योगिक वापराकरिता असलेला ऑक्सिजन पुरवठा हा पूर्णपणे थांबवून तो सर्व रुग्णाकरिता वापरण्यात आलेला आहे.

या कालावधीत उद्योजकांनी दुसऱ्या पर्यायाचा वापर केला. परंतु, तो पर्याय खूप महागडा असल्याने उद्योजकांना परवडणारा नाही. आता सध्या मे महिन्यातील दुसऱ्या पंधरवाड्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीत देखील घट झालेली दिसून येत आहे.

उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उत्पादकांकडे जवळपास 30 ते 40 टक्के ऑक्सिजन साठा शिल्लक राहत आहे. तसेच चिंबळी व रांजणगाव या दोन ठिकाणी मागणी अभावी असलेले ऑक्सिजन प्रकल्प सध्या बंद आहेत. या दोन्ही ऑक्सिजन प्रकल्पाची दररोजची उत्पादन क्षमता 1500 सिलेंडरची आहे.

या प्रकल्पात उत्पादित होणारा ऑक्सिजन साठा हा महाराष्टातील इतर जिल्ह्यांना देऊन शिल्लक राहत असलेल्या ऑक्सिजन साठ्याचा अहवाल दोन दिवसात तयार करण्याचे आदेश पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिले.

पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण, येथे उत्पादित होणारा व अतिरिक्त शिल्लक राहत असलेला ऑक्सिजन साठा, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण, येथील उद्योगांना पूर्ववत सुरु करण्याकरिता येत्या दोन, तीन दिवसात निर्णय घ्यावा, असा आदेश पवार यांनी जिल्हाधिका-यांना दिला असल्याचे बेलसरे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.