Pimpri : स्वच्छता कर्मचा-यांची ‘कोरोना टेस्ट’ करा, खासगी ‘ओपीडी’ सुरु करा -श्रीरंग बारणे

खासदार बारणे यांनी घेतला 'कोरोना' संदर्भातील परिस्थितीचा आढावा

एमपीसी न्यूज – शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेने आणखी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. घरोघरचा कचरा गोळा करणा-या स्वच्छता कर्मचा-यांची ‘कोरोना टेस्ट’ करावी. सर्वेक्षण करत असताना ज्यांना मधुमेह, विविध आजार आहेत. अशांची एक यादी तयार करुन त्यांचीही चाचणी करावी. जेणेकरुन कोरोनाची लागण झाली. असेल तर तत्काळ उपचार करता येतील. क्वारंटाईन केलेल्यांना कोनाच्या संपर्कात येवू देऊ नये. कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत, याची सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच मानवतेच्या दृष्टीकोनातून खासगी डॉक्टरांनाही ‘ओपीडी’ सुरु करण्याचे आवाहन करत महापालिकेनेही सर्वांना ‘ओपडी’ सुरु करण्यास भाग पाडावे अशी सूचनाही त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत तब्बल 52 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आठ दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिकेतील कोरोना वॉर रुमला भेट देऊन माहिती घेतली. काही त्रुटी आहेत. त्या दुरुस्त करण्याचे निर्देश बारणे यांनी प्रशासनाला दिले. महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते नामदेव ढाके, वायसीएमचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यावेळी उपस्थित होते.

श्रीरंग बारणे म्हणाले, महापालिका रुग्णालयात संशयित आणि दाखल झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास 1126 आहे. महापालिका सर्वतोपरी काळजी घेत आहे. प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांनी घरीच रहावे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून समोर यावे. या दृष्टीकोनातून महापालिकेने आणखी प्रयत्न करावेत. जेणेकरुन संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होईल. रुग्ण संख्येत वाढ होणार नाही. याची खबरदारी घ्यावी. अनेक ठिकाणी नागरिकांना क्वारंटाईन केले आहे. एका ठिकाणी 40 पेक्षा जास्त नागरिकांना क्वारंटाईन करु नये. त्यांना कोणाच्या संपर्कात येवू देऊ नका. त्याठिकाणी स्वच्छता ठेवण्यात यावी.

मजूर, परराज्यातील कामगार शहरात अडकून पडलेल्यांसाठी महापालिकेने निवारा केंद्र केले आहेत. त्या नागरिकांना सामाजिक संस्थांमार्फत जेवणाची व्यवस्था केली जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून देखील गरजू नागरिकांच्या जेवनाची व्यवस्था करावी. जेणेकरुन लॉकडाऊनच्या काळात शहरातील कोणीही जेवणापासून भुकेला राहू नये. त्याची महापालिकेने जबाबदारी घ्यावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.

राज्य सरकारने ओपीडी सुरु करण्याचे निर्देश देऊनही महापालिका क्षेत्रातील अनेक ओपडी बंद आहेत. महापालिकेने सांगितल्यामुळे काही डॉक्टरांनी ओपीडी सुरु केल्या आहेत. परंतु, कोरोनाचा रुग्ण उपचारासाठी येईल या भीतीने बहुतांश डॉक्टरांनी अद्यापही ओपीडी सुरु केल्या नाहीत. डॉक्टर जीव धोक्यात घालून काम करतात. मात्र, आता खरी गरज असताना डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेऊन नागरिकांची ससेहोलपट करु नये. शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी डॉक्टरांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून ओपीडी सुरु कराव्यात, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे.

तसेच महापालिकेकडे शहरातील ओपीडीची संख्या आहे. महापालिकेला संपुर्ण माहिती आहे. त्यामुळे डॉक्टरांना ओपीडी उघडण्यास भाग पाडावे, अशा सूचनाही त्यांनी आयुक्तांना केल्या. सर्दी, ताप, खोकला असलेले रुग्ण वायसीएमला जातात. तिथे कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. त्यांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे सर्व खासगी ओपीडी सुरु कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

प्रशासनाला सर्व सहकार्य
महापालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. योग्य उपाययोजना राबविल्या जात आहेत. काही त्रुटी आहेत. त्यात सुधारणा कराव्यात. प्रशासनाच्या निर्णयाला शिवसेनेचा पुर्णपणे पाठिंबा आहे. या आपत्तीमध्ये सर्वजण एकत्र आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. सर्वजण एकत्र आल्याने आपण कोरोनाला नक्की हरवू असा विश्वासही खासदार बारणे यांनी व्यक्त केला. तसेच शहरवासीयांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची कळकळची विनंतीही त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.