Pimpri Crime News : पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला फी न भरल्यामुळे प्राचार्यांसह शिक्षकांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – फी न भरल्यामुळे पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांनी मारहाण केली. यामध्ये विद्यार्थ्याच्या डोक्याला, हात, पायाला गंभीर इजा झाली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 29) सकाळी घडला आहे.

शुभम बारोथ असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शुभम हा रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी येथे मास कम्युनिकेशन (पत्रकारिता) च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. शुभमने दीड महिन्यापुर्वी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना फी कमी करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यात त्याने म्हटले होते की, मागील एक वर्षापासून आम्ही ऑनलाईन क्लास करत आहोत. स्टुडिओ देखिल वापरता आलेला नाही. त्यामुळे फी कमी करावी.’

यानंतर बुधवारी शुभम महाविद्यालयात गेला असता त्याला प्राचार्यांची सही हवी होती. त्यानिमीत्ताने तो प्राचार्यांकडे गेला असता त्याला कोडून घेत प्राचार्यांनी मारहाण केली. त्यानंतर शुभमला बाहेर आणून मारहाण केली, असा आरोप शुभमच्या नातेवाईकांनी केला आहे. यात शुभमच्या डोके, हात, पायाला गंभीर दुखापत झाली.

याप्रकरणी महाविद्यालयाकडून सविस्तर खुलासा करण्यात आला आहे. महाविद्यालायकडून देण्यात आलेल्या खुलासापत्रात म्हटले आहे की, शुभम बारोट हा विद्यार्थी प्राचार्य कक्षामध्ये त्याचा वर्गमित्र ओंकार जाधव याच्यासह सकाळी 11 वाजता आला. फी माफीविषयी प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्याशी वाद घालू लागला. प्राचार्य त्यांना वारंवार समजावून सांगत होते फी मला माफ करण्याचे अधिकार नाहीत. रयत शिक्षण संस्था, सातारा व महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार तुम्हाला फी भरावी लागेल. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार कोविड 19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ज्या बाबींचा वापर करण्यात आला नाही त्या बाबींची फी 2021-2022 या शैक्षणिक वर्षात माफ करावी, असे असताना ती सवलत तुम्हाला या वर्षासाठी 2020-2021 मी देऊ इच्छितो. व उर्वरित फी तुम्ही टप्प्याटप्प्यामध्ये भरु शकता. असे प्राचार्यांनी सांगितले.

परंतु शुभम बारोट यास यापैकी काहीही मान्य नव्हते. तो बाहेर गेला व मोबाईल घेऊन परत आला. पुन्हा प्राचार्यांशी चर्चा केली व केबिनच्या काचेच्या दरवाजावर स्वतः धडक मारली व त्यानंतर त्याने दुसरी जोरदार धडक मारली असता केबिनच्या दरवाजाची काच फुटुन त्याला लागली. काचेचा एक मोठा तुकडा उडून प्राचार्य कक्षाबाहेर असणाऱ्या शिपाई सेवक सुरेश देसाई यांच्या हातावर लागली. त्यांना मोठी जखम झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर हा विद्यार्थी काचेचा पडलेला तुकडा घेऊन बाहेर गेला. काही गैरप्रकार घडू नये म्हणून महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला धरुन आणले. पोलीस येईपर्यंत एका खोलीत थांबविले. असा प्रकार घडला असून या विद्यार्थ्यास प्राचार्य वा कोणत्याही शिक्षकाकडून मारहाण करण्यात आलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.