Pimpri: देहू-आळंदी ते काळेवाडी बीआरटी मार्गावर जुन्या बॅरिकेड्सचा वापर – विरोधी पक्षनेत्याचा आरोप

एमपीसी न्यूज – देहू-आळंदी ते काळेवाडी बीआरटी मार्गातील बॅरिकेड हे निगडी येथून काढून आणून बसविले आहेत. बीआरटी मार्गातील एका ठिकाणाहून काढलेले बॅरिकेड दुरूस्त करून दुस-या ठिकाणी बसविले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. जुनेच बॅरिकेड्स नवे म्हणून वापरले जात असून यामध्ये आर्थिक घोटाळा केला जात आहे. यामध्ये अधिकारी व ठेकेदार यांची मिलिभगत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट येथील पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. येथील डेडीकेट लेनला जुने बॅरिकेड्स बसविले आहेत असा आक्षेप घेत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी बुधवारी (दि.1) बीआरटीमार्गाची पाहणी केली.

साने म्हणाले, “बीआरटी मार्गातील एका ठिकाणाहून काढलेले बॅरिकेड दुरूस्त करून दुस-या ठिकाणी बसविले आहेत. संबधित बॅरिकेड जुनेच आहेत. तसेच गंजलेले व तांत्रिक दृष्टया पूर्णता अयोग्यरित्या बसविलेले आहेत. बीआरटीचे काम अयोग्यपध्दतीने चालू आहे, हे महापालिका अधिका-यांनी कबूल केले आहे. जुनेच बॅरिकेड्स नवे म्हणून वापरले जात असून आर्थिक घोटाळा केला जात आहे. यामध्ये मनपाचे वरिष्ठ अधिकारी व ठेकेदार यांची मिलिभगत आहे. याची आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले, “संबंधित बॅरिकेड्स हे जुने नसून नवीनच आहेत. त्यांना रंग दिलेला नाही. एम्पायर पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर हा मार्ग तातडीने सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. तसेच सुरक्षेच्या उपाययोजनासाठी काम सुरू आहे. कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम नाही”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.