Pimpri: पिसाळलेलं कुत्र मेल वाटतं?, पशुवैद्यकीय अधिका-याचे महापौरांना दुरुत्तर

एमपीसी न्यूज – रुपीनगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी सुमारे वीस जणांना चावा घेतला तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाला त्याचे काही देणेघेणे नाही. पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले का? असे महापौरांनी विचारले असता पिसाळलेलं कुत्र मेल वाटत? असे दुरुत्तर पशुवैद्यकीय अधिका-याने महापौरांना दिले. त्यामुळे संतापलेल्या महापौरांनी पशुवैद्यकीय अधिका-याला चांगलेच खडसावले.

नवनिर्वाचित महापौर माई ढोरे यांचा प्रशासकीय कामकाजाचा आज (सोमवारी) पहिला दिवस होता. एका पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी (दि.24) रुपीनगर परिसरात उच्छाद मांडला होता. सुमारे वीस जणांना कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. लहान मुले घराच्या अंगणात खेळत असताना त्यांच्यावर झडप घालून कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

याबाबत महापौर ढोरे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी अधिक माहिती घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांना दूरध्वनी केला. दगडे यांनी आपण पुण्यात असल्याचे सांगितले. निगडी, रुपीनगर परिसरातील नागरिकांना चावा घेतलेले पिसाळलेले कुत्र पकडले का? असे महापौरांनी विचारले असता पिसाळलेलं कुत्र मेल वाटत? असे दुरुत्तर दगडे यांनी महापौरांना दिले. त्यामुळे महापौरांनी दगडे यांना चांगलेच खडेबोल सुनावले. उद्या सविस्तर अहवाल घेऊन कार्यालयात येण्याचे निर्देश दिले.

…अन् अधिकाऱ्यांनी लाल ऐवजी काळे कुत्रेच घेऊन गेले -सांगितला अनुभव
महापौरांनी पशुवैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा आलेला अनुभव देखील पत्रकारांना सांगितले. महापौर ढोरे म्हणाल्या, सांगवीतील एक पिसाळलेले कुत्रे पकडण्यास सांगितले होते. आपण स्वत: हातगाडीवर बसलेले लाल रंगाचे पिसाळलेले कुत्र पकडायचे असल्याचे अधिका-यांना दाखविले. मात्र, अधिकारी हातगाडीखाली बसलेले काळे कुत्रेच घेऊन गेल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.