Pimpri News : पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतरही पोलिसांकडून गंभीर प्रकरणात साध्या गुन्ह्याची मलमपट्टी

आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी चालला पोलिसांचा अट्टाहास

एमपीसी न्यूज – चोरी आणि फसवणुकीच्या एका प्रकरणात पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले. त्या चौकशीत दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे एमआयडीसी भोसरी पोलिसांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेश दिले. त्यानंतरही एमआयडीसी भोसरी पोलिसांनी फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात चोरीच्या सध्या गुन्ह्याची मलमपट्टी केली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतरही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशी टाळाटाळ केवळ आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी तर करत नाहीत ना, अशी शंका सुरेश बाबू तिरुमल्ला शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

सुरेश बाबू तिरुमल्ला शेट्टी (वय 52, रा. पाषाण, पुणे) यांची फसवणूक झाली आहे. त्यांची संजीव रामप्रकाश गुप्ता, अभिनव संजीव गुप्ता, रविंदर गुप्ता (तिघे रा. चिंचवड) यांच्या विरोधात तक्रार आहे. गुप्ता बंधूंच्या विरोधात याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दाखल आहे.

शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 1998 मध्ये एस एस इंजिनिअर्स नावाचा कारखाना शेट्टी पती-पत्नीने मिळून भागीदारीत सुरु केला. पॉवर प्रेस, शेअरिंग मशीन, लेथ मशीन, मिलिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, सीओटू वेल्डिंग मशीन, बँड सॉ मशीन, ग्रॅण्डर मशीन, सीएनसी पंचिंग मशीन, सीएनसी बेंडिंग मशीन, पावडर कोटिंग प्लांट, टूल्स, डाईस, फिक्चर आणि अन्य अशा सुमारे 300 मशीन खरेदी केल्या. त्या सर्व मशीन एसएस इंजिनिअर्स कंपनीच्या म्हणजेच शेट्टी या पती-पत्नीच्या मालकीच्या आहेत.

सुरेश बाबू तिरुमल्ला शेट्टी आणि रविंदर गुप्ता यांनी 50-50 टक्के भागीदारीत एसएसआर प्रेस पार्टस प्रा ली ही कंपनी स्थापन केली. या कंपनीसाठी एमआयडीसी मधील एक प्लॉट एमएसएस फॅब्रिकेशन यांच्याकडून शेट्टी आणि संजीव गुप्ता यांनी विकत घेतला. सदरचा प्लॉट पहिल्या दिवसापासून आजतागायत सुरेश बाबू तिरुमल्ला शेट्टी यांच्या ताब्यात आहे.

सन 2006 मध्ये सुरेश बाबू तिरुमल्ला शेट्टी, संजीव गुप्ता व रविंदर गुप्ता यांनी जेजुरी येथील मुंद्रा स्टील प्रा.लि. हि कंपनी विकत घेतली. सदर कंपनी मध्ये सुरेश बाबू तिरुमल्ला शेट्टी यांचे 40 टक्के समभाग तसेच गुप्ता बंधू यांचे प्रत्येकी 30 टक्के समभाग होते.

कालांतराने या कंपनीच्या जागेवर आयनक्स ऑटो पार्टस प्रा. ली. ही कंपनी शेट्टी, संजीव गुप्ता, रविंदर गुप्ता यांनी मिळून स्थापन केली. त्यानंतर सहा महिन्यांनी विकास गोयल यांना 20 टक्के शेअर आणि एम केशवराव (सुरेश बाबू तिरुमल्ला शेट्टी यांचे सासरे) यांना 40 टक्के शेअर ठेऊन या कंपनीत सहसंचालक म्हणून घेतले. आयनक्स ऑटो पार्टस कंपनीसाठी नवीन मशीन खरेदी न करता शेट्टी यांच्या मालकीच्या एस एस इंजिनिअर्स या कंपनीतील मशीन वापरण्याचे ठरले. त्यानुसार मशीन वापरण्यात आल्या. त्या मशीनची मालकी शेट्टी यांचीच आहे.

आयनक्स ऑटो पार्टस प्रा ली. या कंपनीत शेट्टी हे टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. त्यात ते कंपनीतील कामगार, कंपनीसाठी लागणारा माल, मशिनरी, ऑर्डर पोहोच करणे असे काम आहे. कंपनीत संजीव गुप्ता हे कंपनीतील देण्या-घेण्याचे व्यवहार पाहतात. कंपनीत 40 कामगार आहेत.

19 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी संजीव गुप्ता आणि त्यांचा मुलगा अभिनव संजीव गुप्ता यांनी मोनू ठाकूर या भंगार व्यावसायिकाच्या मध्यस्थीने 150 टन पॉवर प्रेस आणि 50 टन पॉवर प्रेस अशा दोन मशीन विकल्या.याबाबत शेट्टी यांनी गुप्ता यांना जाब विचारला व पोलिसात तक्रार दाखल करण्याचे सांगितले. त्यावर गुप्ता याने पोलिसात तक्रार न करण्याची विनंती केली.

शेट्टी यांनी मशीन विकत घेणा-यांना फोनवरून माहिती विचारली असता त्यांनी या मशीन संजीव रामप्रकाश गुप्ता, अभिनव संजीव गुप्ता, रविंदर गुप्ता यांच्याकडून खरेदी केल्या असून त्याचे दोन टप्प्यात सात लाख रुपये दिले असल्याचे सांगितले. सुरेश बाबू तिरुमल्ला शेट्टी यांच्या मालकीच्या 10 लाख रुपये किमतीच्या मशीन गुप्ता मंडळींनी सात लाख रुपयांना बेकायदेशीरपणे विकल्या.

सन 2010 मध्ये संजीव गुप्ता आणि रविंदर गुप्ता यांनी शेट्टी यांचा दमदाटी करून एसएसआर प्रेस पार्टस आणि मुंद्रा स्टील या दोन कंपन्यांमधून जबरदस्तीने राजीनामा घेतला. दरम्यान शेट्टी यांच्या मालकीच्या मशीन आणि जागा वापरापोटी त्यांना दरमहा दीड लाख रुपये देण्याचे ठरले. तसेच आयनक्स ऑटो पार्टस कंपनीत टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम करत असल्याचे दरमहा एक लाख असे एकूण अडीच लाख रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचे ठरले होते.

कोट्यवधी रुपयांचे मशिनरी, साहित्य आणि जागा वापरून सुरेश बाबू तिरुमल्ला शेट्टी यांना गुप्ता बंधूंनी आजवर कोणताही परतावा दिलेला नाही.

18 डिसेंबर रोजी शेट्टी यांनी संजीव गुप्ता यांच्याकडे मोबदला आणि त्यांच्याकडे असलेल्या मशीन परत देण्याबाबत विचारले असता संजीव गुप्ता यांनी तीन अनोळखी व्यक्तींना बोलावले. त्या अनोळखी व्यक्तींनी शेट्टी यांना ‘तू जास्त नाटकं करू नको. तुला महागात पडेल. तुझ्या जीवाचे बरे वाईट करून टाकेल. माझ्या मोठ्या लोकांत ओळखी आहेत. माझे सहकारी इशरत अली व नरेंदर सिंग उप्पल हे खूप पोहोचलेले आहेत. तुला गायब करून टाकतील’ अशी धमकी दिली.

संजीव गुप्ता यांनी ‘तुला जर जिवंत राहायचे असेल तर गुपचूप एक कोटी रुपये तूच आम्हाला आणून दे व तुझा जीव वाचव’ अशी शेट्टी यांना धमकी दिली. शेट्टी यांच्या मशीन, जागा वापरल्या. त्याचा त्यांना ठरल्याप्रमाणे मोबदला दिला नाही. शेट्टी यांचा संचालक पदाचा जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतला. मोबदला देण्याबाबत विचारणा केली असता गुप्ता बंधूंनी अनोळखी व्यक्तींच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देत एक कोटींची खंडणी मागितली.

दरम्यान गुप्ता याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेतली. कृष्ण प्रकाश यांनी शेट्टी यांना बोलावून घेतले आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे आर्थिक गुन्हे शाखेला आदेश दिले. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बाबर व अय्यर यांनी आठ दिवस चौकशी केली.

त्यात गुप्ता बंधू दोषी आढळले असता गुप्ता बंधूंनी याबाबत कारवाई न करण्याची आर्थिक गुन्हे शाखेकडे विनंती करत आम्ही यावर शेट्टी यांच्यासोबत सामंजस्याने मार्ग काढतो, असे आश्वासन दिले. मात्र, गुप्ता यांनी तोडगा न काढता थेट दिवाणी न्यायालयात धाव घेत सुरेश बाबू तिरुमल्ला शेट्टी यांच्या विरोधात खटला दाखल केला.

आर्थिक गुन्हे शाखेने पोलीस आयुक्तांकडे चौकशीचा अहवाल दिला. त्यावर गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांना आदेश दिले. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी यातील केवळ चोरीच्याच प्रकरणाचा गुन्हा नोंदवला. फसवणुकीचा उल्लेखही केला नाही. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी हे जाणीवपूर्वक या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

पोलीस आयुक्तांनी सांगूनही एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन मधील काही घटक या गुन्ह्याच्या कामी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. गुप्ता यांनी देखील न्यायालयाची पद्धतशीरपणे व लबाडीने दिशाभूल करून व खोट्या पोलीस स्टेशनचा उल्लेख करून कार्यक्षेत्र नसलेल्या न्यायालयातून अर्ज करून जामीन घेऊन आजतागायत ते मोकाट फिरत आहेत.

तसेच सुरेश बाबू तिरुमल्ला शेट्टी यांना रोजच्या रोज सदर कंपनीत बाऊन्सर्स नेमून सुरेश बाबू तिरुमल्ला शेट्टी यांना दमदाटी करीत आहेत व त्यांच्या दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण करीत आहते. याप्रकरणी शेट्टी यांनी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे तीन वेगळ्या तक्रारी दाखल करून देखील केवळ तीन अदखलपात्र गुन्ह्यांची (NC) नोंद केली आहे.

अशा वेळी न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तिरुमल्ला सुरेश बाबू शेट्टी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.