Pimpri : राष्ट्रवादीतर्फे शिरूरमध्ये विलास लांडे तर मावळातून संजोग वाघेरे?

(अनिल कातळे)

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार विलास लांडे यांचे तर मावळ लोकसभा मतदारसंघातून पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांचे नाव जवळ-जवळ निश्चित झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मावळ मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आहे, मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पार्थ यांना उमेदवारी देण्यास उत्सुक नसल्याने वाघेरे यांचे नाव पुढे आल्याचे समजते.

लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय मोर्चेबांधणीला चांगलाच वेग आला आहे. शिरूर व मावळ हे दोन्ही मतदारसंघ गेली दहा वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहेत. शुिरूरमधून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील तर मावळातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हेच पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले असून दोघांनाही कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शिरूर व मावळ हे दोन्ही मतदारसंघ यावेळी कोणत्याही परिस्थिती खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने व्यूहरचना चालवली आहे. त्यासाठी विजय खेचून आणणारा सक्षम उमेदवार कोण असेल, यावर पक्षात वरिष्ठ पातळीवर जोरदार खलबते चालू आहेत. त्यातून शिरूरमधून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि मावळातून पवार घराण्यातील युवा नेते पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आले. दिलीप वळसे पाटील हे स्वतः लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे यापूर्वी निवडणुकीचा अनुभव असलेल्या विलास लांडे यांचे नाव जवळ जवळ निश्चित झाल्याचे समजते.

मावळातून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे. पार्थ पवार यांनी या महिन्यात मतदारसंघातील अनेक जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबरच कार्यकर्ते व नेत्यांच्या गाठीभेटींचा सपाटा लावला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात होते. स्वतः पार्थ पवार किंवा अजित पवार यांनी मात्र पक्ष देईल तो उमेदवार अशी सावध भूमिका घेत त्यांची मोर्चेबांधणी चालू ठेवली आहे. पवार कुटुंबातील सदस्य उमेदवार दिल्यामुळे गटबाजी विसरून सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करतील आणि मावळची जागा पक्षाला खेचून आणता येईल, असे गणित मांडण्यात येत आहे.

पार्थ पवार यांची ही पहिलीच निवडणूक म्हणजेच राजकारणातील प्रवेश असल्याने कोणतीही जोखीम घेण्यास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तयार नाहीत. याखेरीज पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागण्याबरोबरच विरोधकांना घराणेशाहीबाबत टीकेचे आयते कोलीत दिल्यासारखे होऊ शकते. त्यामुळे यापूर्वीही पवार यांनी पार्थ यांच्या उमेदवारीस हिरवा कंदिल देण्यास नकार दिला होता. या निवडणुकीत पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघाची धुरा खांद्यावर घेऊन पक्षाचा उमेदवार निवडून आणावा आणि पुढील निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरावे, असा सबुरीचा सल्ला पवार यांनी पार्थ यांना दिल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.