pimpri: गुड न्यूज ! दिल्लीच्या तबलिगी कार्यक्रमातून आलेल्या 81 वर्षीय जेष्ठाची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज – दिल्लीतील तबलिगीच्या कार्यक्रमातून आलेल्या एका 81 वर्षीय वृद्धाने कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे वृद्धाचे 14 दिवसानंतरच्या उपचारानंतरचे पहिले रिपोर्ट  पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतरही त्यांनी कोरोनावर मात केली आहे.  दोन दिवसांपुर्वी त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील 116 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली असून त्यातील 42 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक असून अनेक रुग्ण कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून 81 वर्षीय जेष्ठ आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. 14 दिवसांच्या उपचरानंतरचे पहिले रिपोर्ट त्यांचे पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पुन्हा पाच दिवसांनी त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यात त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्यामुळे 81 वर्षीय जेष्ठाने कोरोनावर यशस्वी मात केली. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. वृद्धांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. महापालिका रुग्णालयात वृद्ध रुग्णही उपचार घेऊन बरे होत आहेत. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

  पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवासी असलेल्या 116 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 42 जण कोरोनामुक्त होत ठणठणीत झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोणतीही लस उपलब्ध नसताना कोरोना बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवून इच्छाशक्ती प्रबळ केली जात आहे. डॉक्‍टर, नर्स यांच्याकडून योग्य उपचार व मार्गदर्शन रुग्णांना मिळत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. 68 सक्रिय रुग्णापैकी एकाचीही प्रकृती गंभीर नाही. ही समाधानाची बाब आहे. तर, दुर्दैवाने शहरातील तीन आणि पुण्यातील पण महापालिका रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या दोन अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोनही रिपोर्ट पॉझिटीव्ह

पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कासारवाडी भागातील एका कोरोनाबाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोनही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. दोनही रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. या रुग्णाला 12 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. आता तिस-यावेळी त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच आज आणखी एका रुग्णाचे 14 दिवसानंतरचे पहिले रिपोर्टही पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांत सात ते आठ जणांचे 14 दिवसानंतरचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णाचे 14 दिवसानंतरच्या उपचारानंतरही रिपोर्ट पॉझिटीव्ह येत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.