Pimpri: आज आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह तर, तिघे कोरोनामुक्त; आतापर्यंत 145 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रुपीनगर आणि मोशीतील आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 64 वर पोहचला आहे. आज तीघे कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील 135 आणि महापालिका हद्दीबाहेरील दहा अशा 145 जणांना आजर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर, 55 जण कोरोनामुक्त झाले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सकाळी शहरातील नऊ आणि पुण्यातील एक अशा दहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे दिवसभरात 13 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने सोमवारी (दि. 4) 115 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सायंकाळी आले आहेत. त्यामध्ये रुपीनगर आणि मोशीतील रुग्णांचा समावेश आहे. 26, 55 वर्षीय पुरुष आणि 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

महापालिका रुग्णालयात 64 सक्रिय रुग्णावर उपचार सुरु आहेत. शहरातील 11 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खराळवाडी, दापोडीतील तीघे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचे 14 दिवसांचे आणि त्यानंतरच्या 24 तासाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल!
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 206
# पॉझिटीव्ह रुग्ण – 13
#निगेटीव्ह रुग्ण – 105
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 204
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 279
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 108
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 145
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 64
# शहरातील कोरोना बाधित 11 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 5
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 55
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 19838
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 58983

शहरातील हा परिसर ‘सील’!
कोरोनाचे रुग्ण आढळल्याने संत ज्ञानेश्वर हौसिंग सोसायटी- संभाजीनगर चिंचवड येथील रोटरी क्लब- रॅडीश हॉटेल-शिवाजी पार्क लिंक रोड-मनसुख सुपर मार्केट-अंब्रेला गार्डन रोड-नवमी प्युअर व्हेज-निगडी-भोसरी रोड- बनकरवस्ती-, मोशीतील टाय स्ट्रीट जाधववाडी रोड-बनकरवस्ती रोड-नाशिक रोड हा परिसर पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे. या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.