Pimpri: महापालिका तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती? सोमवारी होणार फैसला

शीतल शिंदे, संतोष लोंढे, भीमाबाई फुगे यांच्यात अध्यक्षपदासाठी चूरस

एमपीसी न्यूज – श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या कोणाच्या हाती असणार आहेत?, याचा फैसला येत्या सोमवारी (दि. 2 मार्च ) रोजी होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर लगेच अध्यक्ष कोण होणार? हे स्पष्ट होणार असून अध्यक्षपदाची प्रत्यक्ष निवडणूक शुक्रवारी (दि.6) दुपारी बारा वाजता होणार आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असून शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि भीमाबाई फुगे यांच्यात अध्यक्षपदासाठी चूरस आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. दोन वर्षाच्या कार्यकाळ संपलेल्या सदस्यांच्या जागी बुधवारी (दि.26) भाजपच्या शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे आणि राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर यांची समितीत निवड करण्यात आली. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवारी (दि.2) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. 6 मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पिंपरी महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.