Pimpri: PMPMLला प्रती बस आठ हजारांचा तोटा, प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद

Pimpri: Loss of Rs 8,000 per bus to PMPML, minimal response from passengers कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 वर्षांखालील लहान मुले आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठांना बसमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच बसमध्ये क्षमतेच्या पन्नास टक्केच म्हणजेच फक्त 21 प्रवाशीच प्रवास करत होते.

एमपीसी न्यूज- पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पिंपरी-चिंचवड शहरात बस सेवा सुरु केली असली. तरी, या सेवेला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, पीएमपीला प्रती बस सरासरी आठ हजारांचा तोटा सहन करावा लागत आहे.

पूर्वी दररोज नऊ ते दहा हजारांचे उत्पन्न मिळणाऱ्या बसला आता सरासरी अवघे दोन हजारांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असणाऱ्या पीएमपीचे चाक अजूनच खोलात रुतत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीची बस सेवा बंद होती. मात्र, लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सुचनेनुसार 26 मे पासून शहरात पीएमपीची बस सेवा सुरू झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 वर्षांखालील लहान मुले आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठांना बसमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच बसमध्ये क्षमतेच्या पन्नास टक्केच म्हणजेच फक्त 21 प्रवाशीच प्रवास करत होते.

प्रवाशांमध्ये सुरक्षीत अंतर ठेवावे, मास्क लावणे, मार्गावरील बसची दैनंदिन स्वच्छता व सॅनिटायझींग, डेपोव्यतिरिक्त बस स्थानकांवर सॅनिटायझिंग टीमची नेमणूक करून बसची स्वच्छता, बस स्थानकावर गर्दी होणार नाही याची काळजी घेणे.

या सर्व गोष्टींचे पालन करून शहरातील विविध मार्गांवर बस सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, पहिल्या दिवसापासूनच पीएमपीच्या बस सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरविली.

अनेक बस तर, मार्गांवर रिकाम्या धावत होत्या. दरम्यान, पीएमपी प्रशासनाने पिंपरी-चिंचवड शहरात प्रवासी सेवा पुरविणाऱ्या बसच्या गेल्या आठ दिवसांतील उत्पन्नाची सरासरी काढली आहे.

शहरातील 30 मार्गांवर दररोज 80 बस धावल्या. या बसने दररोज 21 हजार 39 किलोमीटरचा प्रवास केला. या सेवेतून पीएमपीला दररोज सरासरी 1 लाख 85 हजारांचे उत्पन्न मिळाले.

म्हणजेच प्रत्येक बसला सरासरी दोन हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे निदर्शनात आले आहे. या पूर्वी शहरातील प्रत्येक बसला दररोज सरासरी नऊ ते दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. म्हणजेच आता पीएमपीच्या प्रत्येक बसला दररोज आठ हजारांचा तोटा होत आहे.

 

आर्थिक तोटा मोठा
”शाळा, कॉलेज बंद आहेत. तसेच परराज्यातील कामगार वर्गही शहरात नाही. त्यामुळे सध्या प्रवासी संख्या कमी आहे, असा अंदाज आहे.

मात्र, शाळा, कॉलेज बंद असतानाही प्रती बस एवढे कमी उत्पन्न मिळत नव्हते. कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भीती असल्याने नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत नसावेत. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने पीएमपीला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे”, असे पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.