Pimpri: कोविड रुग्णालयात रुजू न झालेल्या खासगी डॉक्‍टरांना नोटीस

Pimpri: Municipal Commissioner in 'Action' mode; Notice to private doctors not joined to Covid Hospital पालिका आयुक्त 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये

एमपीसी न्यूज – कोरोना विरोधातील लढाईसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सेवा अधिग्रहित करूनही कोविड रुग्णालयात रुजू न झालेल्या शहरातील काही खासगी डॉक्‍टरांना पालिका प्रशासनाने नोटिसा बजाविल्या आहेत. येत्या 24 तासात कोविड रुग्णालयात रुजू व्हावे. अन्यथा दवाखान्याची नोंदणी रद्द केली जाईल असा गर्भित इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साखळी घट्ट झाली आहे. शहरात दररोज रुग्ण सापडण्याचा नवीन उच्चांक होत आहे. शहरातील रुग्ण संख्या दहा हजाराच्या उंबरठ्यावर आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पालिकेने आयसीयूचे बेड तयार केले आहेत.  डॉक्‍टरांची कमतरता आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  8 जुलै रोजी शहरातील काही खासगी डॉक्‍टरांची सेवा अधिग्रहीत  केली.

कोविड रुग्णालयात रुजू होण्याचे डॉक्‍टरांना आदेश दिले. परंतु,  डॉक्‍टरांनी नोटीस गांभीर्याने घेतली नाही. नोटीस येवून 11 दिवस उलटले तरी ते अद्याप रुजू झाले नाहीत.  त्यामुळे आयुक्तांनी या डॉक्‍टरांना  नोटीस बजावत  24 तासात कोविड रुग्णालयात रुजू व्हावे. अन्यथा दवाखान्याची नोंदणी रद्द केली जाईल असा इशारा दिला आहे.  महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम2005 नुसार पालिकेमध्ये रुग्णसेवेकरिता हजर व्हावे.   24 तासात खुलासा द्यावा.  अन्यथा पालिका कार्यक्षेत्रात रुग्णसेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र राज्यातील नोंदणी कौन्सिलकडे  नोंदणी रद्द करण्याबाबत कळविण्यात येईल असा गर्भित इशारा दिला आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, महापालिकेने आयसीयू बेड तयार केले आहेत. ते सुरू करण्यासाठी पालिकेकडे मनुष्यबाळाची कमतरता आहे. त्यासाठी खासगी बीएएमएस डॉक्‍टरांची आवश्यकता आहे. त्यामुळे शहरातील काही खासगी डॉक्‍टरांची सेवा अधिग्रहित केली होती. पण, 11 दिवस उलटून गेले. तरी, डॉक्‍टर कोविड रुग्णालयात रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

‘आम्ही काम करण्यासाठी तयार आहोत. पण, आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. तुटपुंजे मानधन दिले जाणार आहे. नोटीस आलेले बहुतांश डॉक्‍टर हे निमा संस्थेचे आहेत असे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) संस्थेकडून सांगण्यात येत आहे.

आम्ही म्हणतो तेच काम करा ही पालिकेची भूमिका चुकीची – डॉ. अभय तांबिले
याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) सचिव डॉ. अभय तांबिले म्हणाले, चार महिन्यासाठी सेवा अधिग्रहित केली आहे. आम्ही काम करण्यासाठी तयार आहोत. पण,  तुटपुंजे मानधन दिले जाणार आहे. यामध्ये आमच्या गरजा भागात नाहीत. चार महिन्यात आमचे रुग्ण तुटणार आहेत. आम्ही कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्यास तयार आहोत. पालिका मात्र आयसीयूत काम करण्याचा आग्रह करत आहे. बीएएमएस डॉक्‍टरांना आयसीयूत काम करण्याचा जास्त अनुभव नसतो. त्याचा ओपोडीशी संबंध येतो. त्यामुळे सीसीसी सेंटरची जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण, आम्ही म्हणतो तेच काम करा अशी चुकीची भूमिका पालिका घेत आहे. तसेच राज्य सरकार 50 लाखांचे विमा संरक्षण लेखी देत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.