Pimpri: महापालिकेच्या ‘कोरोना वॉर’ रुम, शहरातील परिस्थितीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रतिबंधासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आधुनिक टेक्नॉलॉजीचा केलेला वापर सर्वांनी करावा. महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास साथ आटोक्यात आणता येईल, असा विश्वास केंद्र शासनाच्या पथकाचे प्रमुख व अतिरिक्त सचिव संजय मलहोत्रा यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या कोवीड 19 कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेणासाठी केंद्रशासनाच्या पथकाने आज (बुधवारी)महापालिका क्षेत्रात पाहणी केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

आज सकाळी दहा वाजल्यापासून या पथकाने विविध ठिकाणी पाहणी करून माहिती घेतली. या पथकांमध्ये अतिरिक्त महासंचालक डॉ. पी. के सेन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे सहसल्लागार डॉ. पवनकुमार सिंग,अतिरिक्त वरिष्ठ सहाय्यक डॉ. अरविंद अलोने, अन्न व वितरण विभागाचे संचालक करमवीर सिंग यांचा समावेश होता.

या पथकाने आकुर्डी येथील उर्दू माध्यमिक विद्यालय येथे असलेल्या परराज्यातील नागरिकांसाठीच्या निवाराकेंद्राला भेट देवून माहिती घेतली. तेथील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर चिंचवड येथील स्वस्त धान्य दूकानाला त्यांनी भेट दिली. तसेच खराळवाडी येथील कंटेनमेंट झोनची पाहणी त्यांनी केली. तेथे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

त्यानंतर नेहरूनगर येथील पॉलीग्रास हॉकी स्टेडियम येथे सुरू असलेल्या तात्पूरत्या भाजी मंडईची पाहणीही केली. तेथे राबविण्यात येत असलेल्या सोशल डिस्टंसिंग व स्वच्छतेबाबतची माहिती घेतली. तसेच उत्कृष्ट भाजी मंडईचे नियोजन केल्याने इतर ठिकाणीही त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचनाही या पथकाने दिल्या.

महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या वॉर रूमची पाहणीही या पथकाने केली.ई गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करून विकसित करण्यात आलेल्या या वॉर रूमच्या करण्यात येणाऱ्या वापराबाबतची व स्मार्ट सारथी ॲपची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. या पथकाने या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. अशा तंत्रज्ञानाचा वापर सर्वांनी करावा असे मतही व्यक्त केले.

त्यानंतर इंद्रायणीनगर येथील केंद्राची पाहणी केली. तसेच सेक्टर चार मोशी येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात उभारण्यात आलेल्या इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरची पाहणी करून तेथील माहिती घेतली. तसेच क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, आरोग्य वैदयकिय अधिकारी डॉ. के अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, प्रशांत जोशी, बाळासाहेब खांडेकर, संदीप खोत, कार्यकारी अभियंता संजय घुबे, रविंद्र पवार, देवण्णा गट्टूवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.