Pimpri News: महागाईचा आवाज दाबण्यासाठी भोंग्याचा आवाज, सामान्य माणसांचे विषय घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरणार –  प्रवक्ते अतुल लोंढे

एमपीसी न्यूज – कष्टकरी कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या कष्टातून सत्तर वर्षात जे उभे केले ते भाजपाने सात वर्षात मातीत घातले. रोज वाढत जाणाऱ्या महागाईचा आवाज दाबण्यासाठी भोंग्याचा आवाज वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप करीत आहे. आता काँग्रेस शांत बसणार नाही. सामान्य माणसांचे विषय घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज (बुधवारी) पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत  शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, माजी महापौर कवीचंद भाट, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, सेवादल  शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, ज्ञानेश्वर उर्फ माऊली मलशेट्टी, दिनकर भालेकर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितूले आदी उपस्थित होते.

क्रुड ऑईलचे दर साठ डॉलरपेक्षा कमी असताना केंद्र सरकारने भाववाढ करून 27 लाख कोटी रुपये सामान्य नागरिकांच्या खिशातून काढून घेतले. महागाईबाबत निर्लज्जपणाचा कळस म्हणजे भाजप आहे. भाजपच्या काळात कर्जाचे प्रमाण सकल उत्पन्नाच्या 90 टक्केपर्यंत झाले आहे अजूनही कर्ज घेणे सातत्याने सुरू आहे. राज्य सरकारने सीएनजीवरील कर साडेतेरा टक्के वरून तीन टक्‍क्‍यांवर आणला आणि केंद्र सरकारने पुन्हा त्यात वाढ केली. सामान्य माणसांच्या विरोधातील धोरण केंद्रातील भाजप सरकार राबवित आहे अशी टीका करत अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राष्ट्रद्रोहाचे कलम लोकशाहीत योग्य नाही हे काँग्रेसचे धोरण आहे. देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करीत आहे.

केंद्रातील भाजपाला भ्रष्टाचाराची लागलेली कीड पिंपरी- चिंचवड शहरापर्यंत आली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पिंपरी – चिंचवड शहरातील पहिली केंद्र सरकारची कंपनी हिंदुस्तान एंटीबायोटिक्सची स्थापना करण्यात आली. 51 वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. शहराचे पहिले महापौर म्हणून काँग्रेस पक्षाने ज्ञानेश्वर लांडगे यांना संधी दिली. या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये काँग्रेस पक्षाचे योगदान आहे तसेच या शहराला सजवण्यात, नटवण्यात आणि वाढवण्यात शहरातील कष्टकरी कामगार वर्गांचा सिंहाचा वाटा आहे. ज्या लांडगे साहेबांना शहराचा प्रथम महापौर होण्याचा सन्मान काँग्रेसने दिला त्यांचे चिरंजीव मागील पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर निवडून आले. मागील वर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवित असताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने महापालिकेच्या प्रशासकीय भवनात अटक केली. ही घटना शहराच्या नावलौकिकास काळीमा फासणारी आहे, असेही ते म्हणाले.

मागील पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारा प्रामुख्याने प्रश्न म्हणजे अपुरा पाणी पुरवठा. पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी पवना धरण ते रावेत पंप हाऊस पर्यंत बंद पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना कॉँग्रेसच्या काळात मंजूर करण्यात आली. परंतु मागील पाच वर्षात या योजनेत काहीही प्रगती झालेली नाही. भाजपचे पदाधिकारी शहरात असताना एक बोलतात आणि मावळातील नागरिकांना दुसरे सांगतात. भाजपच्या या दुटप्पीधोरणामुळे शहरवासीयांचे हजारो कोटी रुपये बुडण्याचा धोका निर्माण झाल्याचे लोंढे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.