Pimpri News : शहराचा कायापालट करणारी पाच कामे सत्ताधाऱ्यांनी दाखवावी – सचिन आहेर

एमपीसी न्यूज – ‘पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे, सध्या केंद्रात देखील भाजपचीच सत्ता आहे आणि यापूर्वी राज्यात देखील त्यांचीच सत्ता होती. सत्ताधाऱ्यांनी शहराचा कायापालट करणारी पाच कामे दाखवावी, आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन करु,’ असे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना नेते सचिन आहेर म्हणाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सचिन आहेर यांनी आज (गुरुवार, दि.09) सदिच्छा भेट दिली. त्यानंतर गटनेते राहुल कलाटे यांच्या दालनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे, शहरप्रमुख सचिन भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते. सचिन आहेर म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी यापूर्वी सर्वांना संधी दिली. स्मार्ट सिटी कडे वाटचाल सुरू असताना शहरातील समस्या तशाच आहेत. याठिकाणी शिवसेनेला संधी मिळाली नाही. आज आमच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रुपाने एक चेहरा आहे. दोन वर्षात त्यांनी केलेलं काम महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. या गोष्टी घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहचणार आहोत. शहरात पक्ष संघटन वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’

‘राज्यात सत्तेत असलेले मित्र पक्ष सोबत आले तर एकत्र नाहीतर पक्ष संघटनेच्या जोरावर शिवसेना लढेल,’ असे सचिन आहेर म्हणाले. ‘शिवसेना मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली याठिकाणी ज्या पद्धतीने काम करत आहे. त्याच पद्धतीने पिंपरी चिंचवडमध्ये काम करुन शहराचा कायापालट करु शकते,’ विश्वास यावेळी आहेर यांनी व्यक्त केला. नागरिकांची साथ मिळाली तर मंत्री आदित्य ठाकरे शहर दत्तक घ्यायला तयार आहेत. असे सचिन आहेर म्हणाले.’दत्तक म्हणजे मुंबई धरतीवर पिंपरी चिंचवड शहराचा विकास,’ असे स्पष्टीकरण गटनेते राहुल कलाटे यांनी दिले.

यावेळी सचिन आहेर भाजपवर आरोप करताना म्हणाले, ‘भाजपने केवळ ठेकेदारांना जवळ केले आहे. 2017 पासून पालिकेची सत्ता भाजपकडे आहे. शहराचा कायापालट करणारी पाच कामे सत्ताधाऱ्यांनी दाखवावी, आम्ही त्यांचे अभिनंदन करु. स्मार्ट सिटीचा उद्देश काय आहे आणि नेमकं सुरू काय आहे हे देखील पडताळून पाहायला हवं, असे ते म्हणाले.

स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचाराबाबत विचारले असता आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर यावर चर्चा करणं योग्य होईल असे आहेर यांनी सांगितले. शिवसेना शहरातील नागरिकांची मते जाणून घेऊन आपला जाहीरनामा प्रसिद्ध करेल. आणि आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जाईल असे सचिन आहेर म्हणाले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.