Pimpri News :खाद्यतेलाच्या दरवाढीने गोरगरिबांना ‘बूरे दिन’ : काशिनाथ नखाते

महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी

एमपीसीन्यूज : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे सामान्यांच्या हाताचे काम गेले. व्यावसाय मेटाकूटीला आले. अर्थव्यवस्था कोडमडलेली आहे. त्यात सामान्य व कष्टकरी वर्गाला परवडणाऱ्या पामतेलाच्या किमतीनेही उच्चांक गाठला आहे. आता पेट्रोल, डिझेल तर वाढलेच पण त्याच्या दिडपट किमती खाद्यतेलाच्या पाकिटाला मोजावी लागत असून हे केंद्र सरकारचे अपयश आहे. त्यामुळे आता ‘अच्छे दिन’ऐवजी ‘बूरे दिन’ आले आहेत, अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.

यासंदर्भात कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे काशिनाथ नखाते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे खाद्यतेल आणि महागाईच्या विरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे खाद्यतेलाच्या किमतींमध्ये 11 वर्षातील सर्वात उच्चांकी दरवाढ झाली आहे. पाम तेलाची किंमत सुद्धा गेल्या अकरा वर्षात खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पामतेल 132 रुपयांवर पोहोचले आहे. तर इतर तेलाच्या किमती 165 रुपयांपर्यंत गेली आहेत.

भारताला दरवर्षी 230 लाख टनांची खाद्यतेलाची आवश्यकता आहे. त्यात भारतात केवळ 80  लाख टनाचा पुरवठा देशातील बियाणांच्या उत्पादनातून पूर्ण होतो. आवश्यक 70  टक्के तेलाच्या आयातीवर केंद्र सरकारने 50  टक्के शुल्क वाढवले आहेत. याचाच परिणाम म्हणून तेलाच्या किंमती वाढत असून महागाईच्या खाईत सर्वसामान्यांना आणि कष्टकऱ्यांना ढकलण्याचे काम सरकारकडून केले जात आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे अर्थातच इतर सर्व गोष्टी महाग होत असून पेट्रोल-डिझेल पेक्षा दीडपटीने खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता हॉटेलसह इतर खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढणार आहेत. अशा परिस्थितीत कष्टकरी आणि गोरगरिबांसमोर मोठे संकट उभे राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्यावतीने खाद्यतेलाच्या किमती व महागाई कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे नखाते यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.