Pimpri News: निवडणूक विभाग प्रमुखपदी माने यांच्या संभाव्य नियुक्तीस भाजपचा विरोध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत निवडणूक विभाग प्रमुख म्हणून यशवंत माने यांची नियुक्ती होऊ घातली असल्याचा दावा करत त्यांची संभाव्य नियुक्ती रद्द करण्याची मागणी भाजपचे शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थोरात यांनी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत निवडणूक विभाग प्रमुख म्हणून यशवंत माने यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. मात्र माने यांच्या नियुक्तीस आमचा विरोध आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत माने यांनी प्रभाग रचना करताना मोठे घोळ केल्याचे समोर आले होते. या विषयात त्यांची भूमिका संशयास्पद व वादात्मक होती. नदी, लोहमार्ग, रस्ते ओलांडून प्रभागांची रचना करण्यात आली होती अनेक प्रभागांची मोडतोड करण्यात आली होती.

नियमानुसार 50 टक्के आरक्षण गरजेचे असताना देखील माने यांनी 75 टक्के आरक्षण करून काही प्रभागांवर जाणीव पूर्वक अन्याय केल्याचा आरोप थोरात यांनी केला. आरक्षणाच्या या प्रकरणाची चौकशी करावी एवढेच नव्हे तर महापालिका निवडणुकीसाठी अर्जांची छाननी करत असताना दबावाखाली येऊन काही प्रबळ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. हे सारे लक्षात घेता माने यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत निवडणूक विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करणे अन्यायकारक ठरणार आहे. तरी माने यांची महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभाग प्रमुख म्हणून होऊ घातलेली नियुक्ती आपण रद्द करावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.