Pimpri News : वायसीएम रुग्णालयात कर्करोगाशी संबंधित गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

एमपीसी न्यूज – कोरोना या वैश्विक महामारीच्या काळातही कर्करोगाच्या रुग्णासाठी पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) रुग्णांसाठी भक्कम आधार ठरत आहे. एका 15 वर्षीय तरुणीच्या स्वादुपिंड ग्रंथीशी झालेच्या कर्करोगाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. ही शस्त्रक्रिया तब्बल पाच तास चालली.

ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्याकरिता प्रा. डॉ. बालाजी धायगुडे (सर्जरी), प्रा. डॉ. मारोती गायकवाड (भूलशास्त्र), डॉ. आनंद शिंगाडे, डॉ. मनीषा सपाटे, डॉ. कांचन वायकुळे, डॉ. हर्षद गावडे, डॉ. आशिष यादव, डॉ. राजीव बिळासकर, डॉ. पृथ्वी पटेल यांनी परिश्रम घेतले.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, 12 एप्रिल रोजी पूजा (नाव बदलेले) ह्या 15 वर्षीय मुलीला स्वादुपिंड (Pancreas) ह्या ग्रंथीशी संबंधित कर्करोगाचे निदान झाले. सुरुवातीला पोटातील लहान आकाराची असलेली गाठ लगेच वाढून मोठ्या आकाराची झाली. त्यासोबतच रुग्णाला पोटात दुखणे, मळमळ, वारंवार उलट्या ही लक्षणे दिसायला लागली. तसेच भूक देखील मंदावत चालली होती. वजन कमी होऊ लागले.

पूजाच्या आई-वडिलांनी वायसीएम रुग्णालयात प्रा. डॉ. बालाजी धायगुडे पथकाला रुग्ण दाखवला. डॉक्टरांच्या सल्यानुसार तिच्या पोटाचा CT स्कॅन व MRCP करण्यात आले असता तिच्या पोटात 10x14x14 सेंटीमीटर एवढ्या मोठ्या आकाराचा स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले.

डॉक्टरांनी इतर सर्व संबंधित तपासणी करून सर्जरी करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला व त्यांचे संबोधन केले. ही शस्त्रक्रिया जटील स्वरुपाची व गुंतागुंतीची असल्याचे शस्त्रक्रिया करणारे डॉ. संतोष थोरात यांनी स्पष्ट केले. ही शस्त्रक्रिया साधारणपणे पाच तास चालली. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण यशस्वीपणे सुखरूप बाहेर आली.

डॉ. संतोष थोरात, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम), पिंपरी
“स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोग हे अत्यंत वेगाने वाढणारे असतात. पण वेळीच योग्य निदान व योग्य ती शस्त्रक्रिया केल्यास अश्या रोगांमध्ये चांगले परिणाम बघायला भेटतात.”

डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, पदव्युत्तर संस्था,
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम), पिंपरी
“पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) मध्ये तातडीच्या शस्त्रक्रिया जसे की, कर्करोग अथवा संबंधित व्याधी ह्या करोना काळातसुद्धा रुग्णहित लक्षात घेऊन व योग्य ती सर्व काळजी घेऊन केल्या जात आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.