Pimpri News : ऑक्सिजनच्या वापराबाबत महापालिकेच्या खासगी रुग्णालयांना सूचना

एमपीसी न्यूज – ऑक्सिजनचा वापर जपून करण्यात यावा. तसेच त्याचा अपव्यय टाळून ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असलेल्या रुग्णांना प्रथमिकतेने ऑक्सिजन देण्यात यावा, याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेने खासगी रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

शहरातील खाजगी रुग्णालयांना कोविड 19 विषाणुची बाधा झालेल्या रुग्णांना उपचार पुरविण्यासाठी रुग्णांना दाखल करुन घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात एकूण 135 रुग्णांलये कोविड बाधित रुग्णांवर उपचार करीत असून त्यात 9 हजार बेड्स उपलब्ध आहेत.

सद्यस्थितीत कोविड 19 विषाणुची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये श्वसनाच्या वाढत्या तक्रारीमुळे अधिकाधिक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. परंतु ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे व मागणीत वाढ झाल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या कोविड 19 विषाणू बाधित रुग्णांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी खाजगी रुग्णालयांनी खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

पालिकेकडून खासगी रुग्णालयांना करण्यात आलेल्या सूचना –
# रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांस खरोखरच ऑक्सिजनची आवश्यकता आहे काय याबाबत प्रथमतः खातरजमा करावी.
# रुग्णांचे Saturation Level 92 पर्यंत मेन्टेन करण्याकरीता आवश्यक असलेल्या प्रमाणातच रुग्णांस ऑक्सीजनचा वापर/पुरवठा करण्यात यावा व त्यानुसार ऑक्सिजन फ्लो Adjust करण्यात यावा.
# रुग्णांच्या चेहऱ्यावर आकारानुसार लहान अथवा मोठ्या आकाराचे ऑक्सिजन माक्स उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. जेणेकरुन ऑक्सिजनचे लिकेज होणार नाही.
# ऑक्सीजनचा वापर नियंत्रित करण्याकरीता ज्या रुग्णांना माक्सची आवश्यकता नाही. त्यांना मास्कऐवजी Nasal prolgs द्वारे ऑक्सिजन पुरवणे आवश्यक आहे. जेणेकरुन ऑक्सिजनता अपव्यय होणार नाही.
# आयसीयु युनिटमधील तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना वेळच्या वेळी ऑक्सिजन युनिट/वॉर्ड मध्ये स्थलांतरीत करणे तसेच ऑक्सिजन वरील रुग्णांना Saturation Level मेन्टेन झाल्यानंतर वेळीच वार्डमध्ये स्थलांतरीत करण्यात यावे जेणेकरून ऑक्सिजनचा नियंत्रित वापर करणे शक्य होईल.
# रुग्णालयामधील ऑक्सीजन पुरवठ्यासंबंधी संपूर्ण यंत्रणेचे वेळोवेळी लेखापरिक्षण करण्यात यावे.
# HFNO चा कमीत-कमी वापर करण्यात यावा, जेणेकरून ऑक्सिजनची बचत होईल.

सर्व रुग्णालयामार्फत ऑक्सिजनचा मर्यादित व सुयोग्य पद्धतीने वापर करण्यात यावा. जेणेकरून ऑक्सिजनचा होणारा अपव्यय टाळणे शक्य होईल. तसेच ऑक्सिजनचा संभाव्य तुटवडा टाळण्याकरीता यथायोग्य सहकार्य करावे. असेही आयुक्तांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.