pimpri News: कोरोनाबाधित नागरिकांनी प्राधान्याने कोविड सेंटरमध्ये उपचार घ्यावेत – डॉ. अरविंदसिंग कुशवाहा

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पथकाकडून कोविड सेंटरची पाहणी

एमपीसी न्यूज – शासन तसेच महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये उत्तम वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास या आजाराचा उपचार घेण्यासाठी नागरिकांनी प्राधान्याने कोविड सेंटरमध्ये दाखल होवून वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पथकाचे प्रमुख नागपुर येथील ऑल इंडीया इन्स्टिटयुट ऑफ मेडीकल सायन्सेसचे (एम्स) अतिरिक्त प्राध्यापक डॉ. अरविंद सिंग कुशवाहा यांनी केले.

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पथकाने पिंपरी-चिंचवड शहरातील कोविड – 19 अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध कोविड सेंटरला भेट देवून पाहणी केली.

पालिकेच्या वतीने करण्यात येणा-या विविध उपाययोजनांचा आढावा देखील या पथकाने घेतला. डॉ.कुशवाहा यांच्या समवेत नागपुरच्या एम्सचे डॉ. एस. बॅनर्जी होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संगणकीय सादरीकरणाव्दारे शहरातील कोविड संदर्भातील उपाययोजना आणि सद्यस्थितीबद्दल माहिती दिली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उपायुक्त अजय चारठणकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे डॉ.सुनिल पवार, डॉ.परमानंद चव्हाण आदी उपस्थित होते.

पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरला पथकाने भेट देवून तेथील यंत्रणेची माहिती घेतली. डॉ. संदेश कपाले यांनी या सेंटरच्या कामकाजाची माहिती दिली. या सेंटरचे काम व्यवस्थित चालु असल्याबद्दल डॉ. कुशवाहा यांनी समाधान व्यक्त केले.

कोरोना आजाराने बाधित झालेल्या रुग्णांवर याठिकाणी उपचार केल्यानंतर डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचा डॉ.कुशवाहा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सदृढआरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर पथकाने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास भेट देवून तेथील यंत्रणेची पाहणी केली.

शहरातील कोविड – 19 अंतर्गत केलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल डॉ.कुशवाहा यांनी महापालिकेचे कौतुक केले. महापालिका “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिम चांगल्या पध्दतीने राबवत आहे.

सर्व्हेक्षणातून प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यानंतर कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक सक्षमतेने उपाययोजना राबवणे शक्य होणार आहे. भविष्यातील कोरोनाच्या आजाराचा प्रसार विचारात घेता त्यानुसार व्यवस्थापनाचे नियोजन वेळेत करणे आवश्यक असल्याचे डॉ. कुशवाहा यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.