Pimpri news: पालिका करणार सार्स – कोवी 2 विषाणू प्रसाराचे सर्वेक्षण 

डी. वाय. पाटील रिसर्च सेंटरला देणार 44 लाख रुपये; 5 हजार व्यक्तींच्या रक्त नमुन्यांची शास्त्रीय तपासणी होणार  

एमपीसी न्यूज –  नकळत किती लोकांना कोरोनाची लागण झाली आणि किती लोकांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झाली, याची माहिती घेण्यासाठी आता अ‍ॅण्टीबॉडीज चाचणी म्हणजेच ‘सार्स कोवी – 2 सर्वेक्षण’ मोहिम हाती घेण्यात येणार आहे. 

पिंपरी – चिंचवड महापालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या वतीने ही मोहिम राबवली जाणार असून त्यासाठी डी. वाय. पाटील रिसर्च सेंटरला 44 लाख 14 हजार रूपये मोजण्यात येणार आहेत. सर्वेक्षणा अंतर्गत संमती देणा-या पाच हजार नागरिकांचे रक्त नमुने गोळा केले जाणार आहेत. कोरोना विरोधाच्या लढ्यात सार्स कोवी – 2 सर्वेक्षण हे एक महत्त्वाचं अस्त्र ठरणार असून कोरोनाचं संकट नेमके कुठंवर फैलावले आहे, याची माहिती याद्वारे मिळणार आहे.

पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात पदव्युत्तर संस्था कार्यान्वित आहे. तथापि, या पदव्युत्तर संस्थेत प्रिव्हेंटीव्ह सोशल मेडीसीन (पीएसएम) या अभ्यासक्रमाचा समावेश नाही. या पदव्युत्तर संस्थेतील अध्यापक हे कोरोना कामकाजात आपले योगदान देत आहेत. वायसीएम रूग्णालयालगत डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर आहे. या ठिकाणी ‘पीएसएम’ हा अभ्यासक्रम कार्यान्वित आहे.

महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरात किती लोकांना कोरोनाची लागण झाली आणि किती लोकांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झाली, यासाठी नागरिकांची ‘सार्स – कोविड 2 आयजीजी अ‍ॅण्टीबॉडीज’ सर्वेक्षण मोहिम राबविणे आवश्यक आहे. याबाबत 29 जुलै रोजी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका हद्दीतील नागरिकांच्या सार्स-कोविड अ‍ॅण्टीबॉडीज सर्वेक्षणाबाबत चर्चा करण्यात आली.

हे सर्वेक्षण पिंपरी – चिंचवड महापालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या वतीने राबविण्याचे ठरविण्यात आले. याबाबत डी. वाय. पाटील रिसर्च सेंटर यांना प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने डी. वाय. पाटील रिसर्च सेंटर यांनी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावात सायंटीफीक प्रपोजल, मेथॉडॉलॉजी, डिटेल्स ऑफ इन्व्हेस्टीगेटस, बजेट अ‍ॅण्ड रोल्स अ‍ॅण्ड रिस्पॉन्सिबीलीटीज याचा समावेश आहे. डी. वाय. पाटील रिसर्च सेंटर यांनी 14 ऑगस्ट रोजीच्या पत्रानुसार, या सर्वेक्षणासाठी 44 लाख 14 हजार रूपये खर्च अपेक्षित असल्याचे कळविले आहे. हे काम तातडीने करायचे असल्याने डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर यांच्यासमवेत करारनामा न करता अनामत रक्कम न घेता थेट पद्धतीने त्यांना हे काम देण्यात येणार आहे. हा खर्च कोविड 19 या लेखाशिर्षातून करण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाबाबत आघाडीवर असलेल्या पिंपरी – चिंचवडमध्ये कोरोनाप्रसाराचा वेग  वाढतोय. कोरानाबाधितांची संख्या 70 हजार पार झाली आहे. संक्रमणाचा वेग वाढल्यामुळे कोरोनाविरोधातले पुढचे पाऊल म्हणजे कोरोनाचा कल ओळखणं आणि त्याच्या समुह संसर्गाचा आढावा घेणे आहे. या साठीच हिंदुुस्थानी वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) राज्यांना सेरो सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना विरोधातल्या लढाईतला एक अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर सध्या पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाचं काम सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाचा कल ओळखण्यासाठी ‘सार्स कोवी – 2 सर्वेक्षण मोहिम राबविली जाणार आहे.

सार्स कोवी -2 सर्वेक्षणामुळे सर्वसाधारण लोकसंख्येत झालेला कोविडचा भौगोलिक फैलाव समजण्यास मदत होणार आहे. तसेच, सार्स कोविड 2 संक्रमणाचं प्राबल्य समजून घेता येणार आहे. विषाणू संक्रमणातून निर्माण होणा-या सामाजिक आणि लोकसंख्याशास्त्रीय धोके निश्चिती करणास हातभार लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.