Pimpri news: ‘रुग्णसंख्या घटली, नॉन कोविड रूग्णांवर ‘वायसीएमएच’मध्ये उपचार सुरू करा’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे कोविड समर्पित घोषित केलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय ( वायसीएम) कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर देखील उपचार करावेत, अशी मागणी बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे सतीश कदम यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी व पालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील नॉन कोविड ( इतर रुग्णांवर ) रुग्णांवर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय उपचार करीत आहेत.

महापालिकेच्या निर्देशानुसार वायसीएम रुग्णालयात फक्त कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे वायसीएममधील इतर रुग्णांच्या उपचारांबाबत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये केवळ कोवीड 19 वर उपचार सुरु असल्याने त्याठिकाणी इतर आजार व व्याधी असलेल्या रुग्णांवर उपचार बंद आहेत.

त्यामुळे शहरातील रूग्ण डी. वाय. पाटील रुग्णालयांमध्ये जातात. परंतु, त्याठिकाणी सुद्धा आवश्यक खाटांची उपलब्धता कमी असल्याने रुग्णांना दाखल करून घेत नाहीत.

पैशांअभावी उपचार केले जात नाहीत. अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. पैशाअभावी उपचार न केल्याने 5 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची ताजी घटना घडली. परंतु, त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. रुग्णालयामध्ये गरजू , गरीब ,दुर्बल घटकांना उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. तरी या रुग्णालयामध्ये रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही.

या रुग्णालयातील अशा प्रकारांमुळे कोरोना व्यतिरिक्त इत्तर आजार असलेल्या नागरिकांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास होत आहे.

लॉकडाऊन मुळे कामधंदे बंद असल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे.

सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळावेत. यासाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यातील सामंजस्य करार वाढविण्यात यावे; अथवा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सर्व सामान्य रूग्णांसाठी सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.