Pimpri News : डी वाय पाटील कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक, शैक्षणिक फसवणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डी वाय पाटील कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो असे सांगून कन्सल्टन्सीचा व्यवसाय असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने एका पालकाकडून पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर एमबीबीएसला प्रवेश मिळवून न देता आर्थिक आणि शैक्षणिक फसवणूक केली.  ही घटना 2017 ते 17 मे 2022 या कालावधीमध्ये फिर्यादी यांच्या राहत्या घरी तसेच वायसीएम हॉस्पिटल पिंपरी येथे घडली.

सचिन कुबेर शेळके (रा. महेशनगर, पिंपरी) मूळगाव हरळवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रताप लक्ष्मण वाघमारे (वय 64, रा. कोंढवा, पुणे) यांनी मंगळवारी (दि.17) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन शेळके याने माझा वैद्यकीय शिक्षण कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. माझी डी. वाय. पाटील कॉलेजमधील मॅनेजमेंटमध्ये ओळख आहे, असे सांगून फिर्यादी यांच्या मुलीस एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून फिर्यादी वाघमारे यांच्याकडून पाच लाख रुपये रोख आणि धनादेशाद्वारे घेतले. तेव्हपासून आत्तापर्यंत मुलीला प्रवेश मिळवून न देता फसवणूक केली. आरोपीमुळे फिर्यादी यांच्या मुलीचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेल्याने तिचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. तसेच फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.