Pimpri News: गांधीनगर झोपडपट्टीचे होणार पुनर्वसन; झोपडीधारकांना मिळणार 300 चौरस फुटांची सदनिका

पुनर्वसनासाठी 508 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीचे महापालिकेमार्फेत पुनर्वसन केले जाणार आहे. याकामी 507 कोटी 90 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. झोपडीधारकांना प्रत्येकी 300 चौरस फुटांच्या सदनिका दिल्या जाणार असून अकरा मजली उंच गगनचुंबी इमारतीत त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. एकूण 2 हजार 32 झोपडीधारकांना पुनर्वसनाचा लाभ मिळणार आहे.

झोपडीधारकांना 300 चौरस फुटांच्या सदनिका मोफत देण्याबरोबरच साडेचारशे ते 600 चौरस फुटांच्या 476 सदनिका आणि 344 वाणिज्य गाळ्यांची खुल्या बाजारात विक्री केली जाणार आहे. आगामी पाच वर्षात हा गृहप्रकल्प उभारण्याचे बंधनकारक आहे.

पिंपरी-भोसरी मार्गालगत गांधीनगर झोपडपट्टी वसली आहे. ही अगदी मोक्याची जागा आहे. गांधीनगर झोपडपट्टीलगत आता गगनचुंबी ’महिंद्रा हौसिंग सोसायटी’ झाली आहे.

थ्री स्टार, फोर स्टार हॉटेल्स आजूबाजूला आहेत. महापालिका भवनाबरोबरच पिंपरी वाहतूक पोलीस कार्यालय, धार्मिक स्थळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची स्मारके याच परिसरात आहेत.

पीएमपीएमएल बसस्थानकही नजिक आहे. पिंपरी रेल्वे स्थानक आणि भविष्यात मेट्रो स्थानक हाकेच्या अंतरावर आहे.

2002 मध्ये ‘मशाल’ संस्थेमार्फत या झोपडपट्टीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यावेळी 1 हजार 450 झोपड्या असल्याचे आकडेवारी सांगते. आजमितीला 62 हजार 714 चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर गांधीनगर वसले आहे. गुगल मॅप आणि भूखंड व्याप्तीनुसार याठिकाणी 2 हजार 32 झोपड्या असल्याची वस्तुस्थिती आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेने या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी 27 मे 2020 रोजी मेसर्स एम.एम. प्रोजेक्ट कन्सलटंट प्रायव्हेट लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

या सल्लागाराने नुकतेच ‘ड्राफ्ट कन्सेप्ट रिपोर्ट’ आणि संकल्पन आराखडा महापालिका पदाधिकारी – अधिका-यांना सादर केला. हा गृहप्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) नियमावलीनुसार राबविला जाणार आहे.

अकरा मजल्याच्या 5 इमारतीत 1 हजार 829 रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यांना प्रत्येकी 300 चौरस फुटांच्या सदनिका दिल्या जातील. त्यासाठी प्रति चौरस फुट 3 हजार 360 रुपये बांधकाम दर गृहित धरण्यात आला आहे. पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीची उंची 40 मीटर तर विक्रीयोग्य सदनिकांच्या इमारतींची उंची 70 मीटर निश्चित करण्यात आली आहे.

20 मजली गगनचुंबी इमारतीतील 476 सदनिका आणि 344 वाणिज्य गाळे विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यासाठी 3 चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरला जाणार आहे. प्रकल्पासाठी 383 कोटी 61 लाख रुपये खर्च अंदाजित धरण्यात आला आहे. झोपडीधारकांचे पुनर्वसन करताना लाभार्थ्यांना ट्रान्झिट कॅम्प आणि त्यासाठीच्या सर्व सुचिधा मोफत पुरविल्या जाणार आहेत.

ट्रान्झिटसाठी स्थलांतरीत केल्या जाणा-या झोपडीधारकांना बिल्डरमार्फत निवारा, घरभाडे, वीज, पाणी किंवा रोख रकमेची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. वर्क ऑर्डर (कार्यारंभ आदेश) दिल्यानंतर 5 वर्षात गृहप्रकल्प पुर्णत्वास नेण्याचे बंधन बिल्डरवर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.