Pimpri News: देहूतील विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जल्लोष, पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तापरिवर्तन अटळ – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज – तीर्थक्षेत्र देहूगावच्या पहिल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुंसडी मारली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा विजय असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष संचारला आहे. त्यामुळे आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तापरिवर्तन अटळ आहे. महापालिका निवडणुकीत शंभरहून अधिक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

वाघेरे पुढे म्हणाले, जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यामुळे महाराष्ट्राला परिचित असणारे गाव आणि वारकरी परंपरेचा केंद्रबिंदू असलेल्या तीर्थक्षेत्र देहूगावच्या पहिल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु, भाजपच्या खोट्या भुलथापा आणि फसव्या घोषणांना देहूनगरीतील मतदारांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे तिथे भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आमचे नेते अजितदादा पवार आणि मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या निवडणुकीत या ठिकाणच्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससाठी जिल्ह्यातील हा मोठा विजय आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जल्लोष संचारला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी झालेल्या या निवडणुकीमुळे फसव्या भाजपला आणि त्यांच्या खोटं बोलणा-या नेत्यांना आरसा दाखवला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील भाजपने पाच वर्षापूर्वी अशीच खोटी आश्वासने आणि भूलथापा देऊन सत्ता मिळवली. गेल्या पाच वर्षाच्या कारभारात भाजपमुळे प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. शहराचे कोणतेही प्रश्न भाजपने सत्ता असताना देखील तडीस नेलेले नाहीत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये देखील सत्ता परिवर्तन अटळ आहे. शहरातील नागरिकांनी आणि मतदारांनी अजितदादा पवार यांच्याकडे पुन्हा शहराचे नेतृत्व देण्याची तयारी केलेली आहे. महानगरपालिका निवडणुकीत 100 हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील आणि पूर्ण बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन होईल, असे वाघेरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.