Pune News : पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन असल्याचे सिद्ध- चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – राज्यातील नगरपालिका – नगरपंचायती तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळविल्या असून पुन्हा एकदा ‘भाजपाच नंबर वन’ हे सिद्ध झाले आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगितले. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी आणि सुनील कर्जतकर उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरविल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मतदारांचे आभार मानले आणि पक्षाच्या गावोगावच्या नेते – कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपाला या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन 34 नगरपालिका – नगरपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता असेल. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असेल तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजपा सत्तेवर येईल.

पाटील पुढे म्हणाले, गेले 26 महिने भाजपा राज्यात सत्तेबाहेर आहे तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे. भाजपाच्या नेते – कार्यकर्त्यांची एकजूट आहे त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले आहे. सत्ताधारी आघाडीमध्ये बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नाही. कोरोनाचा सामना करणे आणि राज्यात विकासकामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाईमध्ये गुंतले आहेत. जनता या प्रकाराला कंटाळली आहे. जनतेची नाराजी नगरपालिका – नगर पंचायतींच्या निकालात दिसली.

राज्यात नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका किंवा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने भाजपाला कौल दिला होता. तसाच कौल नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुकीतही दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.