Pimpri News: महापालिकेत 11 नगरसेवक वाढणार, आता 139 नगरसेवक होणार

एमपीसी न्यूज – राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 11 ने वाढणार आहे. सद्या पालिकेचे 128 नगरसेवक आहेत. 11 नगरसेवक वाढणार असल्याने महापालिकेची नगरसेवक संख्या 139 होणार आहे.

सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान 17 सदस्य व कमाल 65 इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत  लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहित धरुन अधिनियमात नमुद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्या देखील वाढेल व त्यामुळे पर्याप्त सदस्य संख्या निश्चित होईल.

12 लाख ते 24 लाखा दरम्यान लोकसंख्या असलेल्या महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 11 ने वाढणार आहे. 2011 च्या जनगणेनुसार पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. तर, आता अंदाजे 25 लाख शहराची लोकसंख्या आहे. त्यामुळे पिंपरी महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 11 ने वाढणार आहे. त्यामुळे 128 नगरसेवकांची संख्या आता 139 होणार आहे. प्रभागातील लोकसंख्याही कमी होणार आहे. आता 40 हजार होती. त्यात पाच हजाराने कमी होऊन 35 हजार लोकसंख्या होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.