Pimpri News: क्रीडा क्षेत्रात सुधारणा; घंटा गाडीवरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले – तुषार हिंगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घंटा गाडीवर काम करणा-या कर्मचा-यांचा कायम करण्याचा प्रश्न 22 वर्षांपासून प्रलंबित होता. कोरोना काळातही फ्रंट वॉरीयर म्हणून त्यांनी काम केले. पण, त्यांना कायम केले जात नव्हते. आयुक्तांना त्याचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर या कामगारांना कायम करण्याच्या महासभेत ठराव मान्य करुन घेतला. या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. क्रीडा क्षेत्रात काम करता आल्याचे मावळते उपमहापौर तुषार हिंगे यांनी सांगितले.

चांगले काम केले असतानाही अचानक राजीनामा घेतल्याचे वाईट वाटले. पक्षाचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे. आदेश मिळताच तत्काळ राजीनामा दिला असेही ते म्हणाले.

शहराचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी पक्षाच्या आदेशानुसार बुधवारी (दि. 14) महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. वर्षभरात काय काम केले. त्याचा त्यांनी आढावा सांगितला आहे.

प्रश्न – वर्षभरात काय काम केले?
उत्तर – 14 जून 2019 क्रीडा सभापतीपद देण्यात आले. त्यानंतर उपमहापौरपदही मिळाले. शहरातील 615 शाळा घेऊन शहरात पहिल्यांदाच मोठा महापौर चषक घेतला. त्यात पालिका, खासगी शाळेतील 25 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विविध 20 खेळ निवडले होते.

तसेच आरंभ फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत जाऊन शिक्षक, विद्यार्थी, पालकांचे फिट इंडिया अंतर्गत सेमिनार घेतले. मुलांना शिक्षणाबरोबरच खेळात टाकणे किती आवश्यक आहे. त्याचे महत्त्व पटवून दिले. 100 शाळांमध्ये हा उपक्रम राबविला. त्याची सांगता बालेवाडी स्टेडियमवर केली. पालिकेच्या विद्यार्थ्यांना 200 बसच्या माध्यमातून तिथे नेले होते. महापौर चषक झाला आणि शहरात कोरोनाचे संकट आले.

प्रश्न – कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने कामाला संधी मिळाली का?
उत्तर – 22 नोव्हेंबर 2019 रोजी पक्षाने मला उपमहापौरपदाची संधी दिली. उपमहापौर असताना काम करण्याची मोठी संधी मिळाली. विविध भागातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहचविल्या. शहरातील नागरिकांची विविध कामे, प्रश्न सोडविले. त्याचे समाधान आहे.

कोरोनात गोरगरिबांना अन्नधान्य वाटप केले. कोरोना काळात नागरिकांची काळजी घेतली. पोलिसांच्या कुटुंबियांना मोफत भाजीपाला वाटला. पोलिसांना सॅनिटायझरचे टनेल दिले. कोविड सेंटरमध्ये गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. तिथे जावून त्यांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविल्या. उपमहापौर असताना विविध कामे करण्याची संधी मिळाली.

प्रश्न – पक्षाने एकाचवेळी दोन पदे दिली होती. त्याबाबत काय भावना होती?
उत्तर – महापौर चषक घेतला होता. त्या कामाची पावती म्हणून मला उपमहापौरपद केले असेल असे मी मानतो. हा चांगल्या पद्धतीने शहराचे प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळेच मला संधी दिली होती. पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रश्न – क्रीडा क्षेत्रात तुम्ही लक्ष घातले होते. त्यात सुधारणा केली. त्याबाबत काय सांगाल?
उत्तर – शहरात शिक्षणाबरोबर क्रीडा सारखा महत्त्वाचा विषय आहे. भारतात क्रीडा क्षेत्रात सर्वाधिक सुविधा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आहेत. मोकळ्या जागा, मैदाने, क्रीडांगणे अशा विविध सुविधा आहेत. आरक्षणे ताब्यात आहेत. त्यामुळे मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सध्या मैदानांची परिस्थिती गंभीर आहे. वेगळ्याचा कामासाठी त्याचा वापर होत आहे. शहरातील मैदाने एका-एका खेळासाठी दिले असते.

तर शहरातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू निर्माण झाले असते. त्यासाठी मी प्रयत्न केले. भविष्यातही करणार आहे. शहरातील क्रीडा प्रेमींसाठी काम करत राहणार आहे. आयुक्तांच्या बंगल्यासमोरील रोडवर गैरप्रकार चालत होते. त्याला बंद करुन सायकल ट्रक, स्केटिंकच्या सरावासाठी ते उपलब्ध करुन दिले. त्यामुळे शहराच्या मुलाला स्केटिंगमध्ये गोल्ड मिळाले.

प्रश्न – शहरातील पाणीपुरवठ्याबाबत तक्रार केली होती. तो प्रश्न सुटला का?
उत्तर – शहरात गढूळ पाणी पुरवठा होत होता. त्याबाबत प्रशासनाला धारेवर धरले. पाणीपुरवठा शुद्ध आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने दिलेली उत्तरे असमाधानकारक आहेत. टाक्या साफ नसल्यामुळे पाणी गढूळ येत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. एक दोन दिवसात पाहणी करणार आहे. पालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे. चार महिन्यांपूर्वी नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा होत होता. आताच का अडचणी येत आहेत. प्रशासनाचे लक्ष नाही.

प्रश्न – उपमहापौर पदावर असताना केलेले चांगले काम कोणते?
उत्तर – पालिकेच्या घंटा गाडीवर काम करणा-या कर्मचा-यांचा कायम करण्याचा 22 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित होता. कोरोना काळातही फ्रंट वॉरीयर म्हणून त्यांनी काम केले. पण त्यांना कायम केले जात नव्हते. आयुक्तांना त्याचे महत्व पटवून दिले. त्यानंतर या कामगारांना कायम करण्याच्या महासभेत ठराव मान्य करुन घेतला.

त्याचबरोबर पॅरोमिडेकल कर्मचारी दहा वर्षांपासून पालिकेत काम करतात. ते देखील कायम नाहीत. तांत्रिक कर्मचा-यांना 18 वर्ष झाले. ते देखील कायम नव्हते. त्यामुळे कोरोना काळात काम करणा-या 300 लोकांना कायम करण्यासाठी पाठपूरावा करत आहे. त्यांना कायम करण्याचा ठराव करुन राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. अनेक वर्षांपासून वंचित असलेल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळनार आहे.

प्रश्न – पक्षाने नेमका अचानक राजीनामा का घेतला?
उत्तर – उपमहापौर झालो होतो. त्याचेवेळी 11 महिन्यांसाठी पद देणार असल्याचे ठरले होते. 22 नोव्हेंबरला मला हे पद मिळाले होते. त्याच्या एक महिना अगोदर मला राजीनामा देण्यास सांगितले. मी पक्षामुळे उपमहापौर आहे. शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी मला राजीनामा देण्याचा आदेश दिला. त्यांचा आदेश येताच अर्ध्या तासात राजीनामा दिला.

चांगले काम केले असतानाही अचानक राजीनामा घेतल्याचे वाईट वाटले. शहराध्यक्ष महेशदादांशी बोललो. जशी मला संधी मिळाली आहे. तशी बाकीच्यांनाही संधी मिळाली पाहिजे. अशी आमची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले. मी चांगले काम केले, उपमहापौरपदाला योग्य न्याय दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. 11-11 महिन्यात दोघांना संधी द्यायची असल्यामुळे राजीनामा घेतल्याचे त्यांनी सांगितले.

प्रश्न – पुढील भूमिका काय असेल?
उत्तर – पक्ष देईल. ती भूमिका असणार आहे. उपमहापौर, क्रीडा समिती सभापती असताना हाताळलेले विषय, प्रलंबित राहिलेले विषय मार्गी लावणार आहे. शहरातील नागरिकांसाठी जी कामे माझ्याकडून करायची राहिली आहेत. भविष्यात ती करत राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.