Pimpri News: शहराला कोरोना प्रतिबंधक लसींचा अधिकचा पुरवठा करा; शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे यांचे आरोग्यमंत्र्यांना साकडे

मपीसी न्यूज – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मागीन दोन लाटांचा अनुभव लक्षात घेता पिंपरी – चिंचवडमध्ये यंदा मृत्यू प्रमाण रोखणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन, बेड टंचाई जाणवता कामा नये, आतापासूनच राज्य सरकारने पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कोरोना लढ्याचा आढावा घ्यावा, अशी विनंती शिवसेना राज्य संघटक, ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली. तसेच, पिंपरी – चिंचवड शहराला कोरोना प्रतिबंधक लसींचा अधिकचा पुरवठा करावा, असे साकडेही घातले.

शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेत त्यांना पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोना सद्यस्थितीबाबत माहिती दिली. त्याची माहिती पत्रकारांना देताना घोळवे म्हणाले, कोरोना महामारीमुळे देश चिंताग्रस्त आहे. आजपर्यंत पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाच्या दोन लाटा येवुन गेल्या आहेत. या दोन्ही लाटांमध्ये महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि पॅरामेडीकल स्टाफ यांनी अतिशय उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच कोविडची परिस्थिती आटोक्यात आली. अनेक नागरिकांचे प्राण वाचले.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बेड संख्या अपुरी होती. रुग्णांना व्हेंटीलेटर, ऑक्सिजन बेड आणि साधे बेड देखील मिळत नव्हते. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) सह जिजामाता, भोसरी या ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करण्यात आली. वाढती रुग्णसंख्या विचारात घेता राज्य शासनाच्या मदतीने नेहरुनगर येथे जम्बो कोविड रुग्णालय तसेच महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे ऑटो क्लस्टर रुग्णालय, भोसरी येथे बालनगरी, घरकुल आदी ठिकाणी रुग्णांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली. मात्र, तरीही बेड संख्या अपुरी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक रुग्णांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह नेहरुनगरचे जंम्बो रुग्णालयात ऑक्सिजन यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रकार घडले. ऑक्सिजनची कमतरताही निर्माण झाली. तथापि, मोठी दुर्देवी घटना घडली नाही.

कोरोनावर आज नियंत्रण मिळवल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी तिसऱ्या लाटेची भीतीही व्यक्त केली जात आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका आहे, असाही अंदाज वर्तवला जात आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर त्याचा मुकाबला करण्याकामी महापालिका आयुक्तांना योग्य ते आदेश द्यावेत. प्रशासनाने पुर्वी केली त्यापेक्षाही अधिकची तयारी करावी, असे निर्देश द्यावेत, महापालिकेची रुग्णालये सुसज्ज ठेवावीत, व्हेंटीलेटर – ऑक्सिजन यंत्रणा अद्ययावत ठेवाव्यात अशी विनंती आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आली. कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरण मोहिमेचा वेग वाढवावा, अशी मागणीही करण्यात आल्याचे गोविंद घोळवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.