Pimpri News: पदाधिका-यांचे स्मार्ट सिटी, पीएमपीएमएलचे संचालकपदही जाणार, नगरसेवकांना रविवारनंतर लेटरहेडवर महापालिकेची ‘मुद्रा’ वापरण्यास मनाई

एमपीसी न्यूज –  कोरोना, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण यामुळे महापालिकेची निवडणूक लांबली आहे. महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 13 मार्च (रविवारी) रोजी संपुष्टात येणार आहे. रविवारनंतर माजी होणा-या नगरसेवकांना लेटरहेडवर महापालिकेची मुद्रा वापरण्यास मनाई केली जाणार आहे. नगरसेवकांचे नामफलक देखील काढण्यात येणार आहेत. पदाधिका-यांचे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी, पीएमपीएमएलचे संचालकपदही जाणार आहे. महापालिकेतील त्यांच्या दालनाला टाळे ठोकण्यात येईल. महापालिका, स्मार्ट सिटीचीही सर्व सूत्रे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडेच राहणार आहेत. त्यामुळे आयुक्तांची ‘पॉवर’ वाढणार आहे.

महापालिका पदाधिकारी, नगरसेवकांचा कार्यकाळ 13 मार्चपर्यंत आहे. 14 मार्चपासून महापालिकेत आयुक्त राजेश पाटील प्रशासक म्हणून कार्यभार पाहणार आहेत. 13 मार्चच्या सायंकाळी महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, विषय समिती सभापती, प्रभाग समिती सभापतींना महापालिकेची वाहने परत करावी लागणार आहेत. त्यांच्या महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालयातील दालनालाही टाळे ठोकण्यात येणार आहे.

13 मार्चनंतर नगरसेवकांना लेटरहेडवर महापालिकेची मुद्रा वापरता येणार नाही. खासगी गाडीवर देखील पदाचा बोर्ड, महापालिकेची मुद्रा लावता येणार नाही. मुद्रा वापरल्यास तो गुन्हा ठरेल. नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे असे दिशा दर्शविणारे फलक देखील काढावे लागणार आहेत. माजी झालेल्या नगरसेवकांना महापालिका कामाबाबत कोणताही अधिकार राहणार नाहीत. अधिकारीही ऐकणार नाहीत. त्यापार्श्वभूमीवर पुढील निवडणूक लढविण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांचे थकबाकी नसल्याचे लागणारे दाखले नगरसेवकांनी माजी होण्यापूर्वीच काढून घेतले आहेत.

स्मार्ट सिटी, पीएमपीएमएलचे संचालक पदही जाणार!

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे प्रमोद कुटे, मनसेचे सचिन चिखले हे संचालक आहेत. तर, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपीएमएल) वर महापौर उषा ढोरे आणि स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे संचालक आहेत. हे संचालक 13 मार्चनंतर नगरसेवक राहणार नाहीत. माजी नगरसेवक होणार आहेत. त्यामुळे त्यांचे स्मार्ट सिटी आणि पीएमपीएमएलवरील संचालकपदही आपोआप जाणार आहे. स्मार्ट सिटीचीही सर्व सूत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडेच राहणार आहेत.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

 प्रशासकाची कार्यपद्धती कशी राहणार?

महापालिकेतील नगरसेवकांचा रविवारी कार्यकाळ संपल्यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून सोमवारपासून आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे असणार आहे. प्रशासकाने कसे काम करावे याबाबत राज्य शासनाने कार्यपद्धती घालून दिली नाही. त्यामुळे प्रशासकाचे कामकाज कसे असणार,  आर्थिक विषय, धोरणात्मक विषयांना मान्यता कशी दिली जाणार आहे. करारनामे कसे केले जाणार आहे. त्यावर कोणत्या अधिका-यांची स्वाक्षरी असणार, याबाबत उत्सुकता आहे. त्यासाठी गेल्या अडीच ते दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या नवी मुंबई, कोल्हापूर महापालिकेतील कामकाज पद्धतीचा अभ्यास केला जात आहे. तसेच शहरातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या, मुलभूत सुविधा सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर क्षेत्रीय कार्यालय स्तरावर टोल फ्री नंबर सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.