Pimpri News: चिंचवड, दिघी, वाकडमध्ये तीन चो-या : 3 लाख 75 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – चिंचवड, दिघी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी गुरुवारी  (दि. 21) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या चार घटनांमध्ये दोन मोबाईल फोन, रोख रक्कम, डंपर आणि दागिने असा एकूण तीन लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

 

चिंचवडमधून दोन मोबाईल हिसकावले
किरण अशोक सोनवणे यांचा 15 हजार तर नितेश ढगे यांचा 10 हजारांचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. किरण सोनवणे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे साडेपाचच्या सुमारास एसकेएफ कंपनी गेट समोर आणि मोरया गोसावी मंदिराच्या समोर घडल्या.

 

वकिलाने घरात घुसून रोकड चोरली

दिनेश बाटुमल देवनानी (वय 41, पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. 20) पहाटे चार वाजता वकील असलेल्या दिनेश धरमदास लालवाणी (वय 50, रा. पिंपरी) यांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांना बटसारख्या साधनाने डोक्यात मारले. त्यानंतर फिर्यादी यांच्या घरातून 50 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.

 

दिघीमधून डंपर चोरीला
दिघी येथील ओम स्टोन खडी मशीनच्या बाजूला पार्क केलेला तीन लाख रुपये किमतीचा डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 19 एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी मोहमद करीम फौजदार (वय 40, रा. मोशी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.