Pimpri news: ऑटो क्लस्टरमध्ये बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याचा ‘व्हिडीओ’ सोशल मीडियावर व्हायरल

एमपीसी न्यूज – ऑटो क्लस्टरमधील महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलचे संचलन करणाऱ्या फॉर्च्युन स्पर्श हेल्थकेअर या संस्थेच्या सल्लागाराने बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याचा ‘व्हिडीओ’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पैसे घेतल्याचा मोठा पुरावा असल्याचे बोलले जात आहे.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू असून फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर ही खासगी संस्था त्याचे संचलन करते. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता.

याबाबतचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. नगरसेवकांनीही आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर प्रशासनाने आज याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.

आता डॉ. सचिन कसबे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात, प्रसाद वाबळे त्यांच्या आई संदर्भात ते माझ्याकडे आले होते. हॉस्पिटलमध्ये बेड नसल्याने त्यांना ऑटो क्लस्टरमध्ये बेड मिळून जाईल, असे मी त्यांना सुचविले होते. तिथे डॉ. प्रवीण जाधव आहेत. ते ऑटो क्लस्टरमध्ये राऊंडला जातात किंवा सल्लागार आहेत. त्यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी सांगितले की कोणताही पेशंट असेल किंवा काही असेल, तर पाठवून द्या आम्ही तिथे बेड अडजेस्ट करून देऊ.

त्याच्या अगेस्ट त्यांनी बहुतेक एक लाख रुपये घेतलेत. या सगळ्या गोष्टींशी माझा एक रुपयांचा काडीमात्र संबंध नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे प्रसाद वाबळे आहेत ते माझे मित्र बालाजी मोरे यांचे वर्गमित्र आहेत. हॉस्पिटलची माणसे एक लाख रुपये घेऊन गेले. मला बोलवले तर मी कुठेही येईल. मला काय अडचण नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.