Pimpri News: ‘वायसीएमएच’च्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मिळणार सव्वालाख रुपये कोरोना भत्ता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील 59 विद्यार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भाव काळात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याचे बहूमूल्य कामकाज पार पाडले. त्यांच्या या योगदानाप्रीत्यर्थ महापालिकेमार्फत त्यांना 1 लाख 21 हजार रुपये कोरोना भत्ता म्हणून देण्यात येणार आहे. दोन समान हप्त्यांत त्यांना ही रक्कम मिळणार आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. वायसीएम रुग्णालयात प्रथम वर्ष 36 आणि द्वितीय वर्ष 23 असे एकूण 59 पदव्युत्तर अभ्यासक्रमास विद्यार्थी कार्यरत आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागल्यानंतर 24 मार्च 2020 रोजी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध कोरोना वॉर्ड आणि कोरोना केअर सेंटर स्थापन करण्यात आले.

महापालिकेचे वायसीएम रुग्णालय हे कोरोना रुग्णांवरील उपचाराकरिता समर्पित करण्यात आले होते. वायसीएम रुग्णालयांमधील रुग्णांचा वाढता व्याप लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात सहा महिने कालावधीकरिता मानधनावर वेळोवेळी वर्ग एक ते वर्ग चारच्या श्रेणीतील विविध कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली होती.

या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्यातील सरकारी व महापालिका वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कनिष्ठ व वरिष्ठ निवासी विद्यार्थ्यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याचे बहूमुल्य कामकाज पार पाडले. त्यांच्या योगदानाप्रीत्यर्थ ऋणनिर्देश म्हणून प्रतीकात्मक रक्कम म्हणून 1 लाख 21 २हजार रुपये भत्ता म्हणून त्यांना देण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये विभागाने 6 ऑक्टोबर 2021 रोजी यासंदर्भात आदेश जारी केले होते. त्यानुसार, सरकारी महापालिका वैद्यकीय महाविद्यालये आणि सरकारी आयुर्वेद महाविद्यालयांतील सध्या कार्यरत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाच हा भत्ता देय राहणार आहे. ही रक्कम दोन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच ऑक्टोबर 2021 आणि मार्च 2022 अशी देय राहील, असे आदेशात नमूद केले होते. त्यानुसार 59  विद्यार्थ्यांना 1 लाख 21 हजार रुपये याप्रमाणे 71 लाख 39 हजार रुपये इतका खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.