Pimpri-Chinchwad Holi : निर्बंधानंतर पुन्हा होतेय रंगांची उधळण; पण लक्षात ठेवा कोरोना अजून गेला नाही!

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले निर्बंध काहीसे कमी झाले आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर मोकळ्या वातावरणात होळीच्या रंगांची उधळण होत आहे. एकमेकांच्या घरी जाऊन, मित्रमंडळी एकत्र जमीन होळी खेळत आहेत. पण लक्षात ठेवा कोरोना संकट अजून पूर्णपणे गेलेलं नाही. त्यामुळे रंगांची उधळण करताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे.

मार्च 2020 मध्ये कोरोना साथ भारतात आली आणि लगेच निर्बंध वाढू लागले. संपूर्ण जग बंद झाले. मित्र परिवार, नातेवाईक, हितचिंतकही एकमेकांना भेटू शकत नव्हते. अशात दोन वर्ष निघून गेले. हा दोन वर्षांचा कालावधी प्रत्येकासाठी अतिशय कठीण होता. सर्वसामान्य नागरिक ते शासन अशा प्रत्येकाने या काळात तारेवरची कसरत केली आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाने निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे यावर्षी मुक्तपणे, निर्बंधमुक्त वातावरणात रंगांची उधळण करता येत आहे.

मात्र कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे गेले नाही. त्यामुळे होळीच्या पार्श्वभूमीवर शासनाने काही निर्बंध घालून दिले आहेत. या काळात डीजे लावण्यास बंदी असेल. डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन करू नये. असे वर्तन करताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे.

महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी, असेही शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लाऊ नये. अन्यथा कारवाई होईल. कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये. धुळवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये, असे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

शासनाने दिलेले निर्बंध पाळून प्रत्येकजण रंगांची मुक्तपणे उधळण करत आहे. कोरोनानंतर एकमेकांना भेटून आनंद साजरा करत आहे. हा रंगबेरंगी आनंद साजरा करताना रंगाचा बेरंग होणार नाही, याची काळजी मात्र प्रत्येकाने नैतिक पातळीवर घेणं आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.