Pimpri : भविष्यात गैरसमजातून मतभेद न होण्याची ग्वाही – श्रीरंग बारणे

भविष्यात युती टिकविण्यासाठी खासदार बारणे यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्थानिक पातळीवर काही  गैरसमजुतीतून आरोप-प्रत्यारोप झाले. भविष्यकाळात युती टिकावी म्हणून आम्ही स्वत: दोन पावले पुढे टाकत आहोत. सर्वाना बरोबर घेऊन सर्वानुमते एकदिलाने आम्ही काम करू तसेच मागील मतभेदांची पुनरावृत्ती टाळू, अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे.

खासदार श्रीरंग बारणे व भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकीय वैमनस्यातून भाजपचे कार्यकर्ते अजूनही प्रचारात सक्रिय झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर खासदार बारणे यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांना एक फेसबुक पोस्टद्वारे ‘आपण सर्वजण एकजुटीने, एकदिलाने काम करू’ असे आवाहन केले आहे. युतीमधील संबंध सुधारण्यासाठी आपण दोन पावले पुढे टाकत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

सर्व मतभेद बाजूला ठेवून बारणे यांनी स्वतः आमदार जगताप यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व प्रचारात सक्रिय होण्याचे आवाहन केले. त्यानंतर आमदार जगताप व शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट झाली. त्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही जगताप यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्याचे अत्यंत विश्वासू सहकारी व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील काल जगताप यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला. त्यानंतरही जगताप व त्यांचे सहकारी प्रचारात सक्रिय  झालेले नाहीत. त्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार बारणे यांनी त्यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर पोस्ट टाकून युतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकजुटीने व एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. शिवसेना-भाजपा युती ही  विचारांची युती आहे. हिंदुत्वावर आधारीत आहे. मधल्या काळात पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्थानिक पातळीवर काही  गैरसमजुतीतून आरोप-प्रत्यारोप झाले. भविष्यकाळात युती टिकावी म्हणून आम्ही स्वत: दोन पावले पुढे टाकत आहोत. सर्वाना बरोबर घेऊन सर्वानुमते एकदिलाने आम्ही काम करू तसेच मागील मतभेदांची पुनरावृत्ती टाळू, अशी ग्वाही मी स्वत: महायुतीचा उमेदवार या नात्याने देत आहे. सर्वांचा आदर, सन्मान राखून एकजुटीने काम करण्यासाठी आपण सर्वजण सदैव कटिबध्द राहूयात, असे बारणे यांनी म्हटले आहे.

बारणे यांच्या या भावनिक आवाहनाला आमदार जगताप यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.