Pimpri : आता टाटा कंपनी, अधिका-यांच्‍या दडपशाहीला बळी पडणार नाही -शरद ढमाले

एमपीसी न्यूज – शिवराय, ज्ञानोबा, तुकाराम यांचा वारसा सांगणारे मावळे आहोत. टाटाच्‍या, शासकीय अधिका-यांच्‍या दडपशाहीला बळी पडणार नाही. आत्तापर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन करत आलो. परंतू आता यापुढे उग्र आंदोलन करुन आमच्‍या न्‍याय हक्‍काचे पूल, सुविधा घेणारच. तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही, टाटा कंपनीने सावध व्‍हावे, असा इशारा मुळशीचे माजी आमदार शरद ढमाले यांनी दिला.

मुळशी धरणग्रस्‍तांच्‍या मुळशी-वाघवाडी पूल, आंबवणे-कुंभेरी-तिस्‍करी पुल, धरणग्रस्‍तांसाठी गावठाण, नागरी सुविधा या प्रलंबित प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्‍यासाठी चाचीवली (ता.मुळशी) येथे धरणपात्रात चारीबंद आंदोलन करण्‍यात आले. यावेळी ढमाले बोलत होते. उपस्थित धरणग्रस्‍तांनी पात्रातील दगड चारीत टाकून टाटा कंपनीचा प्रतिकात्‍मक निषेध केला.

  • यावेळी रिपाईचे पुणे जिल्‍हा संपर्क प्रमुख श्रीकांत कदम, अशोक कांबळे, भाजपाचे तालुकाध्‍यक्ष विनायक ठोंबरे, अशोक साठे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सचिन पळसकर, पांडुरंग निवेकर, गणपत वाशिवले, विठठल पडवळ, संतोष कदम, धरण मंडळाचे माजी अध्‍यक्ष मारुती मापारे, अनंता वाळंज, भांबर्डेचे सरपंच श्रीराम वायकर, माजी सरपंच गोविंद सरुसे, एकनाथ जांभुळकर, जयराम दिघे, वडगावच्‍या सरपंच अर्चना वाघ, सुभाष वाघ, माजी सरपंच दशरथ गोळे, मारुती कुडले, दत्‍तात्रय कुंभार, अर्जुन पाठारे, मालेचे माजी सरपंच विजय दळवी, प्रशांत जोरी, बाळासाहेब कुरपे, मारुती कुरपे, विशाल पडवळ आदी उ‍पस्थित होते.

यावेळी ढमाले म्‍हणाले,’टाटांचे भंगार विकले तरी धरणग्रस्‍तांचे प्रश्‍न सुटतील. जगभर मानवतावादी चेहरा मिरवणारी टाटा कंपनी मुळशीत मात्र मुर्दाडपणे धरणग्रस्‍तांचा अंत पाहत आहे. धरणग्रस्‍तांतून नक्षलवाद उदयास येऊन उद्या टाटांच्‍या बॉम्‍बे हाऊसला एखादे विमान धडकले तर त्‍याला टाटाच सर्वस्‍वी जबाबदार असतील.’

  • ‘टाटांच्‍या धरणांमुळे भूमीहीन धरणग्रस्‍त होऊन देशोधडीला लागले. पूर्वजांच्‍याच जमिनीवर घर बांधण्‍यास मनाई होत आहे. धरणग्रस्‍तांना कायदयाचा बडगा दाखवला जातोय. कुळकायदा धरणग्रस्‍तांना का लागू नाही. कंपनी शासनाकडे तर शासन कंपनीकडे बोट दाखवून धरणग्रस्‍तांची फसवणूक करत आहेत. आंदोलन धरणग्रस्‍तांचे असताना गटतट पक्षांच्‍या भिंती उभ्‍या करुन धरण मंडळ, आंदोलने यांच्‍यात फुट पाडून फुटीचा फायदा कंपनीने घेतला असा इतिहास आहे. पुढील महिन्‍यात भिराकडे जाणा-या पाण्‍याचा वॉल्‍व्‍ह बंद करण्‍याचे आंदोलन करण्‍यात येईल. कंपनीच्‍या पॉवर लाईनचे टॉवर पाडू, जाळुन टाकू. आत्‍मदहन, हुतात्‍मा झालो तरी लढा थांबवणार नाही.’ अशा प्रक्षुब्‍ध भावना धरणग्रस्‍तांनी व्‍यक्‍त केल्‍या.

चाचीवली, गोनवडी, वडुस्‍ते, भादसखोंडा, वांद्रे, पिंपरी, भांबर्डे, निवे, बार्पे, मोहरी, आंबवणे, शेडाणी, पोमगाव, आदरवाडी, पळसे, गोनवडी, मुळशी खुर्द, वळणे, वडगाव, वाघवाडी, शिरगाव, घुटके आदी गावांतील धरणग्रस्‍तांनी मोठया संख्‍येने आंदोलनात सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.