Pimpri: वीज वाहिनीचा टॉवर हटविण्यासाठी एक कोटी खर्च!; स्थायी समितीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – औंध-रावेत रस्त्यावरील साई चौक येथील सब-वेच्या कामाला अडथळा ठरणारी अतिउच्चदाब विजवाहिनी आणि टॉवर हटविण्यात येणार आहे. कोकण मेलॅबल इंडस्ट्रिज यांच्याकडून हे काम करुन घेतले जाणार आहे. त्यासाठी तब्बल एक कोटी 28 लाख 93 हजार रुपये वाढीव खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

औंध-रावेत रस्त्यावर स्थापत्य विभागामार्फत सब-वे बांधण्याचे काम सुरु आहे. परंतु, या बांधकामास त्याठिकाणी असलेल्या अतिउच्चदाब विजवाहिनी अडथळा ठरत आहेत. त्यामुळे सब-वेचे काम थांबले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. त्यासाठी विजवाहिनीचे टॉवर तातडीने हटविणे आवश्यक आहे. टॉवर स्थानांतरित न केल्याने काम करणे शक्य होत नाही. स्थापत्य विभागाने टॉवर हटविण्याची मागणी केली आहे.

  • त्यानुसार महापारेषण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून टॉवर हटविण्याचे कामाचे अंदाजपत्रक मागविले. त्यानुसार टॉवर हटविण्यासाठी एक कोटी 29 लाख 97 हजार रुपये खर्चाचे अंदाजपत्रक त्यांनी दिले आहे. त्याचबरोबर टॉवर हटविण्यासाठी तेथील महापालिकेच्या रावेत येथील पाणी पुरवठा पंप हाऊसची केबल देखील हलविणे आवश्यक आहे. हे काम कोकण मेलॅबल इंडस्ट्रिज यांच्याकडून एक कोटी 28 लाख 93 हजार रुपयांमध्ये केले जाणार आहे. त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.