Pimpri : महापालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन; टॉयलेट सेवा ऍपचे अनावरण

एमपीसी न्यूज – ‘आबालवृद्ध आणि महिला यांच्यावर नको प्रसंग बाका, (Pimpri)म्हणूनच ध्येय आणि ध्यास एकच, स्वच्छता गृहांची सर्वांनी स्वच्छता राखा’ अशा घोषणेने महानगरपालिकेच्या टॉयलेट सेवा ऍपच्या दुसऱ्या पर्वास सुरूवात झाली. या सुधारित ऍपचे उद्घाटन आरोग्य विभागप्रमुख यशवंत डांगे यांच्या हस्ते महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे करण्यात आले.

या कार्यक्रमास आरोग्य विभागप्रमुख यशवंत डांगे, (Pimpri)आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, राजेश आगळे, उमेश ढाकणे, सिताराम बहुरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी के. डी. दरवडे, राजू साबळे, शांताराम माने, महेश आढाव, सामाजिक कार्यकर्ते अमोल भिंगे, टॉयलेट सेवा ऍपचे व्यवस्थापकीय संचालक प्रितम चोपडा, सहकारी सोनाली चोपडा, उज्ज्वला चोपडा तसेच आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक, मुकादम आदी उपस्थित होते.

Pune :एकटया सुप्रिया सुळे यांचं नव्हे तर अनेक खासदारांचे निलंबन झाले : अजित पवार

अमोल भिंगे म्हणाले, भारतामध्ये घराबाहेर पडल्यानंतर नागरिकांना स्वच्छतागृहांबाबत बऱ्याच समस्या जाणवतात. विशेषतः महिलांना, लहान मुलांना, वृद्धांना, पोलीस कर्मचाऱ्यांना, वाहन चालकांना या समस्येचा सामना करावा लागतो. गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या दिवसांमध्ये या समस्येचे गांभीर्य वाढते. पिंपरी चिंचवड महापालिकेने ही समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून एक पाऊल पुढे टाकत टॉयलेट सेवा ऍपचे अनावरण केले आहे.

स्वच्छतागृहांविषयी नागरिकांना परिपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यासाठी, स्वच्छतेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी, तक्रारी करण्यासाठी तसेच या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि उपलब्ध माहिती शोधण्यासाठी, टॉयलेट सेवा ऍप हे एक प्रभावी माध्यम आहे.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये हे ऍप उपलब्ध आहे. भारतातील 1 लाख 30 हजार स्वच्छतागृहांची माहिती या ऍपमध्ये उपलब्ध आहे. या ऍपद्वारे भारतामधील कोणत्याही ठिकाणचे स्वच्छतागृह शोधण्यासाठी नागरिकांना मदत मिळत आहे.

स्वच्छतागृहांमध्ये असणाऱ्या सुविधांचाही या ऍपमध्ये समावेश असून त्यानुसार नागरिक स्वच्छतागृहांची निवड करू शकतात. टॉयलेट सेवा ऍप प्रत्येक स्वच्छतागृहासाठी एक क्युआर कोड तयार करते. हा कोड टॉयलेट सेवा ऍपमध्ये स्कॅन केल्यानंतर त्या स्वच्छतागृहाचा डॅशबोर्ड दाखविला जातो.

या डॅशबोर्डवर नागरिकांना टॉयलेटसंदर्भात तात्काळ अभिप्राय देणे, माहिती पाहणे, मानांकन देणे किंवा तक्रार करणे अशा सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अमोल भिंगे यांनी यावेळी दिली.

आरोग्य विभागप्रमुख यशवंत डांगे म्हणाले, महापालिकेने शहरातील 332 सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती टॉयलेट सेवा ऍप मध्ये उपलब्ध करून दिली आहे. शहरातील सोयीस्कर असे कोणतेही स्वच्छतागृह या ऍपच्या माध्यमातून नागरीक शोधू शकतात. पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामधील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये ऍपच्या माहितीसाठी क्युआर कोड स्टिकर्स लावण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका टॉयलेट सेवा ऍपच्या माध्यमातून मिळणाऱ्या अभिप्रायांवरती कृती करण्यासाठी कटिबद्ध आहे.

आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी टॉयलेट सेवा ऍप तयार करण्यात आले आहे. स्वच्छतागृहासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी ऍपच्या माध्यमातून महापालिकेस अभिप्राय कळवावा जेणेकरून तक्रारींचे निवारण करण्यास तसेच शहरातील स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यास महापालिकेस मदत होणार आहे, असे आवाहनही आरोग्य विभागप्रमुख डांगे यांनी केले आहे.

 

• पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहांसाठी 8 प्रभागांमध्ये विशेष स्पर्धेचे आयोजन.

• स्पर्धेचा कालावधी 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 असा राहील.

• 8 प्रभागांमध्ये प्रत्येकी 2 अशी एकूण 16 पारितोषिके देण्यात येतील.

• टॉयलेट सेवा ऍपमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आणि स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या स्वच्छतागृहांना पारितोषिके दिली जातील.

• हिंदुस्तान युनिलीव्हर या उद्योग समुहाच्या वतीने स्वच्छ स्वच्छतागृह स्पर्धेच्या विजेत्या प्रत्येक प्रभागातील 4 अशा एकूण 32 स्वच्छतागृहांना एका वर्षभरासाठीचा स्वच्छता साहित्य मोफत पुरविण्यात येईल.

• पिंपरी चिंचवड महापालिकेचे कर्मचारी टॉयलेट सेवा ऍपचा वापर दैनंदिन कामकाजात करतील.

• महापालिकेच्या सर्व कार्यालये (इमारती), उद्याने, पादचारी मार्ग, नाट्यगृहे, शाळा येथील स्वच्छतागृहांचा समावेश टॉयलेट सेवा ऍपमध्ये करण्यात येईल.

• पिंपरी चिंचवड महापालिकेचे पथक आवश्यक ती सर्व माहिती टॉयलेट सेवा ऍप मध्ये उपलब्ध करून देईल तसेच या सर्व ठिकाणी ऍप संदर्भातील माहितीसाठी क्युआर कोड स्टिकर्स चिटकविण्यात येतील.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.