Pimpri : हृदयावरील उपचारासाठी ‘त्याने’ केली सव्वा लाखांची चोरी; आरोपी अटकेत

पिंपरी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एका 54 वर्षीय व्यक्तीने चक्क मोपेड दुचाकीची डिक्की फोडून 1 लाख 22 हजार 596 रुपयांची चोरी केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

अनिल सॅमियल गायकवाड (वय 54, रा. पाटील चौक, दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अमोल प्रकाश रावळ (वय 36, रा. चिखली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.

फिर्यादी अमोल 7 मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास चिंचवड स्टेशन चौकात कामानिमित्त त्यांच्या मोपेड दुचाकीवरून आले होते. स्टेशन चौकातील प्रदीप स्वीट दुकानासमोर दुचाकी पार्क करून ते खाद्यपदार्थ खरेदीसाठी गेले असता आरोपी अनिल याने डिक्की उघडून डिक्कीमधून दोन सोन्याच्या बांगड्या, एक मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 22 हजार 596 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरी पोलीस तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास केला असता आरोपी अनिल हा चोरी करताना आढळून आला. त्याच्याबाबत माहिती काढली असता तो मूळ दौंड येथील असून त्याच्या हृदयाच्या उपचारासाठी पुण्यात आला आहे. पोलिसांनी थेरगाव येथून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरी केल्याचे मान्य केले. त्याला हृदयाशी संबंधित आजार आहे. त्याच्या उपचारासाठी तो पुण्यात आला होता. त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नसल्याने त्याने हे पाऊल उचलले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस कर्मचारी राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, अजिनाथ सरक, श्रीकांत जाधव, प्रतिभा मुळे, शहाजी धायगुडे, रोहित पिंजरकर, अविनाश देशमुख, सोमेश्वर महाडिक, उमेश वानखडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.