Pimpri: कामगारांना 30 जूनपर्यंत थकीत वेतन द्या; महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या ठेकेदाराला सूचना

एमपीसी न्यूज – महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांचे वेतन 30 जूनपर्यंत देण्याच्या सूचना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ठेकेदारांना दिल्या आहेत. त्यामुळे कामगारांनी आंदोलन स्थगित केले आहे.

मेट्रो स्टेशनची उभारणी करणाऱ्या एचसीसी अल्फ्रा इन्फ्रा प्रोजेक्‍ट या ठेकेदार कंपनीमध्ये काम करणाऱ्या 100 कामगारांचे वेतन डिसेंबर 2018 पासून थकीत आहे.यातील काही कामगारांना एक-दोन महिन्यांचे वेतन देऊन त्यांना कामावरुन काढण्यात आले होते. कामगार दिनी कामगारांनी उपोषण केल्यानंतर 3 मे रोजी कामगारांच्या वेतनाची काही रक्कम देण्यात आली होती.

  • तसेच 17 व 31 मे 2019 अशी दोन टप्प्यात कामगारांच्या वेतनाची रक्कम देण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. त्यामुळे कामगारांनी उपोषण सोडले होते. मात्र, कंपनीने 31 मे उलटून गेलातरी वेतन दिले नाही. त्यामुळे 1 जून पासून कामगारांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते. या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने आज (शुक्रवारी) फुगेवाडीतील महा मेट्रो कार्यालयावर आणि 10 जूनला कामगार आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.

या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित फुगेवाडी कार्यालयात आल्याची माहिती मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी गुरुवारी (दि.6) थेट महामेट्रोच्या फुगेवाडी कार्यालयावर धडक मारली. त्यावेळी दीक्षितांची अधिकारी व ठेकेदारांसोबत बैठक सुरु होती. दोन तास वाट पाहूनही दीक्षितांची भेट घेऊ न दिल्याने कामगारांनी थेट बैठकीच्या हॉलमध्ये घुसून जाब विचारला. त्यामुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ उडाली.

  • त्यांनतर दीक्षित यांनी कामगारांसोबत चर्चा केली. या बैठकीत मुख्य प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी, कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे, अति. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक रणजित कुमार तर एचसीसी अल्फ्रा इन्फ्रा प्रोजेक्‍ट कंपनीचे प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर अनिल बिराजदार, मयूर आसवानी तर कामगारांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, अभिजीत भास्करे, विनोद भालेराव, प्रभाकर माने, सुजित चव्हाण, केदार घाटपांडे, कृष्ण कुमार, अरुण गायकवाड, तुकाराम जोगी, पवन बिराजदारआदी उपस्थित होते.

यामध्ये उपोषण करणाऱ्या 14 कामगारांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे. या कामगारांना पाठिंबा देणाऱ्या 16 कामगारांना एक महिन्याचे निम्मे व 3 कामगारांना एका महिन्याचे पूर्ण वेतन देण्यात यावे. या सर्व 16 कामगारांचे थकीत वेतन 20 जून 2019 रोजी दिले जाईल. थकीत वेतनाबाबतची माहिती महामेट्रोला 20 जून 2019 रोजी सादर करावी.

  • सर्व कामगारांचे थकीत वेतन 30 जूनपर्यंत ठेकेदाराने अदा करावे, असा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर काम केलेल्या मात्र, रेकॉर्ड उपलब्ध नसलेल्या कामगारांनादेखील द्यावे. आजपर्यंत 88 लाख रुपये कामगारांचे वाटप केले असून, अजूनही सुमारे 75 लाख रुपये देणे बाकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.