Pimpri : महाविद्यालयांबाहेर विनाकारण घुटमळणाऱ्या रोडरोमिओंची धरपकड

42 रोडरोमिओ ताब्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या महाविद्यालयांबाहेर विनाकारण घुटमळणा-या रोडरोमिओंची पिंपरी पोलिसांनी धरपकड केली. ज्या तरुणांचा महाविद्यालयात प्रवेश नाही, परंतु तरीही विनाकारण महाविद्यालय परिसर तसेच महाविद्यालयाच्या बाहेर फिरणा-या एकूण 42 तरुणांना ताब्यात घेतले आहे.

पिंपरी मधील नवभारत महाविद्यालय आणि प्रतिभा महाविद्यालय या दोन महाविद्यालयांबाहेर ही कारवाई करण्यात आली. नवभारत महाविद्यालयाबाहेर घुटमळणा-या 24 तरुणांना ताब्यात घेतले. तर प्रतिभा महाविद्यालयाबाहेर विनाकारण फिरणा-या 18 तरुणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणांची तपासणी करून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश नसताना देखील विनाकारण शाळा-महाविद्यालयांबाहेर टवाळखोर तरुणांची गर्दी पाहायला मिळते. विनाकारण वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, स्टंटबाजी करणे यासारखे उद्योग या टवाळखोरांकडून केले जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढते आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो. म्हणून अशा रोडरोमिओंवर वेळोवेळी कायदेशीर कठोर कारवाई करणे गरजेचे होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे म्हणाले, “महाविद्यालयांबाहेर विनाकारण उभा राहून टवाळखोरी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात आली. तसेच त्या तरुणांकडे आढळलेल्या 24 वाहनांचे नंबर घेतले असून हे नंबर वाहतूक पोलिसांना देऊन त्यानुसार वाहनांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे”

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.