Pimpri : राजकीय वातावरण तापले, अजितदादांचा महापालिकेच्या कारभारावर हल्लाबोल

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीने मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या कारभारावर हल्लाबोल केला. भाजपने शहराचे वाटोळे केले, पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे, कच-याची समस्या उग्र बनली आहे. महापालिकेच्या टेंडरमध्ये तोडपाणी सुरु आहे असे गंभीर आरोप केले.

विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मेळावा घेतला. शहरातील तीनही जागा राष्ट्रवादी लढविणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. तसेच महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले. स्थानिक नेतृत्त्वावर कोणाचा अंकुश नाही. भ्रष्टाचारासाठी शहराची वाटणी केली जाते, हे दुर्देव आहे. महापालिकेतील या भ्रष्टाचाराची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन अजित पवार यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहराबद्दल भाजप सरकारला जराही जिव्हाळा नाही. मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना शहराची काळजी नाही. त्यामुळे मंत्रालयात बसून कळ दाबून उद्घाटने, भूमिपूजने केली जातात. शास्तीकर, अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. पवना धरण काठोकाठ भरुनही आज नळाला पाणी येत नाही. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाबाबत भाजप नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. रस्त्यांवरील साधे खड्डेही बुजविता येत नाही, हे भाजपचे अपयश आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.