Pimpri: ‘फ्लोटिग वॉटर ड्रोन’च्या सहाय्याने नदीपात्रातील निर्माल्य काढणार

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन करताना नदीपात्रात टाकलेले निर्माल्य काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका फ्लोटिग वॉटर ड्रोनचा वापर करणार आहे. त्याच्या सहाय्याने पाण्यात न उतरता तरंगत्या वस्तू काढल्या जाणार आहेत. विसर्जनादरम्यान प्रायोगिक तत्वावार त्याचा वापर केला जाणार आहे.

चिंचवड येथील पवना नदी विसर्जन घाटावर या ड्रोनची चाचणी घेण्यात आली. महापौर राहूल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी संजय खोत यावेळी उपस्थित होते.

फ्लोटिग वॉटर ड्रोनच्या सहाय्याने नदीच्या पाण्यावरील तरंगते प्लॅस्टिक, फुले, निर्माल्य, वनस्पती, थर्माकोल इत्यादी काढून नदी स्वच्छ केली जाऊ शकते. त्यासाठी कोणत्याही कर्मचा-याला किंवा नागरिकाला पाण्यात उतरण्याची आवश्यकता नाही. मशीन बॅटरी ऑपरेटेड असून रिमोट कंट्रोलव्दारे हे मशीन नियंत्रित होते. या मशीनचे वजन अंदाजे 40 किलो असून एकावेळी 350 किलो कचरा त्याव्दारे नदीतून काढला जातो.

गणेश विसर्जन काळात पवना नदीवरील घाटावर 17 ते 20 आणि इंद्रायणी नदीच्या घाटावर 19 व 20 सप्टेंबर असे फ्लोटिग वॉटर ड्रोन ठेवले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.