Pimpri: निवडणूक कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणार – नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई

नागरिकांना दररोज शहर सुरक्षित वाटावे यासाठी परिश्रम घेणार; नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वीकारला पदभार

एमपीसी न्यूज – लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा आपल्याला पुर्वानूभव आहे. त्यामुळे निवडणूक कालावधीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खेड विधानसभा मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल. निवडणूक शांततेत पार पडावी. यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्य असेल. निवडणुकी दरम्यान येणारा नवरात्रोत्सव शांततेत व्हावा यासाठी नियोजन केले जाईल, असे पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगितले. तसेच नागरिकांना दररोज शहर सुरक्षित वाटावे यासाठी परिश्रम घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मावळते पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडून नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज (शनिवारी) पदभार स्वीकारला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिष्णोई यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या कामगिरीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संपूर्ण आढावा घेऊन निवडणुकीपुर्वीची प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी. नागरिकांना शहरात वावरताना सुरक्षित वाटावे यासाठी परिश्रम घेणार आहे. नागरिकांनी कायद्याचा आदर करावा. रात्री नोकरी, प्रवास करणा-या महिलांसाठी सुरक्षा मजबूत करणार असल्याचे सांगत आयुक्त बिष्णोई म्हणाले, पोलिसिंग चांगली असल्यास गुन्हेगारी आपोआप कमी होईल. गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

विविध प्लॅन केले जातात. परंतु, प्रत्यक्षात त्याची अमंलबजावणी झाली पाहिजे. आपला अॅक्शन प्लॅन दिसणार नसून प्रत्यक्षात कामातून दिसेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्यांची उकल करण्यावर आपला भर असेल. लोकांना न्याय मिळवून देणार आहे. प्रत्येक गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. सातत्याने अपघात होणारे स्थळ, वाहतूक कोंडीची ठिकाणे निश्चित केली जातील. त्यानुसार उपाययोजना करणार आहे. नागरिकांना वाहतूक नियमाची शिस्त लावणार आहे. ई-चलनाची माध्यमातून दंडाची रक्कम वसूल केली जाईल.

महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे. त्याचे मुख्य कारण राजकीय हस्तक्षेप होत नाही. राजकीय प्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करत असतात. कामासाठी विनंती करण्याचा त्यांचा हक्क आहे, असेही पोलीस आयुक्त  बिष्णोई म्हणाले. चांगले काम करणा-या अधिका-यांना योग्य ठिकाणी पदस्थापना दिली जाईल. पोलीस अधिका-यांचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम, ध्यानधारणा करण्यास वेळ दिला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1