Pimpri: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे 27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियान

Shiv Sena launches 'Plasma Donation Sankalp' campaign from July 27 to August 3 on the occasion of Chief Minister Uddhav Thackeray's birthday : खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे 27 जुलै ते 3 ऑगस्ट 2020 दरम्यान ‘चला कोरोनाला हरवूया,  चला प्लाझ्मा दान करुया’ या मोहिमेअंतर्गत ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियान राबविण्यात येणार आहे.

यासाठी  शिवसेनेकडून कोरोनामुक्त झालेल्यांशी संपर्क साधला जात आहे. प्लाझ्मा दान करु इच्छिणा-याला वायसीएममध्ये नेण्याची आणि घरी सोडण्याची सोय केली जाणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाची परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळत आहेत. त्यांचे संपूर्ण राज्यावर बारीक लक्ष असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियान राबविण्यात येणार आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, एकीकडे शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. पण, दुसरीकडे बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त आहे. आजपर्यंत सुमारे साडेनऊ हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे रुग्ण आपला प्लाझ्मा दान करु शकतात.

प्लाझ्मा थेरपी यशस्वी होत आहे. थेरपी केल्याने 20 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

प्लाझ्मा हा अँटीबॉडी व विषाणू बरोबर लढा देणाऱ्या पेशींचा समूह आहे.

कोरोना होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तावर प्रक्रिया करून त्याचे अत्यवस्थ व व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना संक्रमण करून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे.विषाणू विरोधात लढणाऱ्या पेशी तयार करून रुग्णांना लवकरात लवकर बरे करणे हा प्लाझ्मा दान करण्याचा  उद्देश आहे.

शिवसेनेतर्फे 27 जुलै ते 3 ऑगस्ट 2020 दरम्यान प्लाझ्मा दान संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी स्वत:चा प्लाझ्मा दान करावा. बाधित रुग्णांना जीवदान द्यावे, हा त्यामागचा हेतू आहे.

शहरातील 9 हजारहून अधिक जणांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. प्लाझ्मा दान केल्यानंतर अनेकांना कोरोनावर मात करता येते. वायसीएमच्या रक्तपेढीत प्लाझ्मा घेतला जाईल. ज्या कोरोनामुक्त रुग्णाला प्लाझ्मा दान करायचा आहे. त्याला वायसीएममध्ये नेण्याची आणि घरी सोडण्याची सोय केली जाणार आहे.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 7263980247 या क्रमांकावर संपर्क साधावा. प्लाझ्मा दान करण्यासाठी जास्तीत-जास्त जणांनी पुढे यावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.