Pimpri : युतीमुळे विषय समित्यांमधील भाजप नगरसेवकांची संख्या कमी होणार

विषय समित्यांमध्ये शिवसेनेला स्थान द्यावे लागणार

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रभाग अध्यक्ष, विषय समित्यांमधील सत्तेचा वाटा शिवसेना नगरसेवकांना दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभाग अध्यक्ष, विषय समित्यांमधील भाजपची संख्या घटणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बालकल्याण समिती आणि कला, क्रीडा व सांस्कृतिक समिती अशा पाच समित्या आहेत. तर, आठ प्रभाग समित्या आहेत. प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 9 मे रोजी प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. 4 मे रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सर्वच प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व आहे. पण, युती झाल्यामुळे आठपैंकी एक तरी प्रभाग समितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी शिवसेनेची मागणी आहे.

त्याचबरोबर विषय समितीत्यांच्या सभापतींची देखील निवड होणार आहे. या चारही विषय समित्यांमध्ये पक्षीय संख्याबळानुसार नगरसेवकांना संधी दिली जाते. समित्यांमधील सदस्यसंख्या 9 असून प्रत्येक समितीत भाजपचे पाच नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक नगरसेवक प्रत्येक समित्यांमध्ये आहे.

लोकसभेला युती होताच महापालिकेतील विषय समित्यांचे अध्यक्षपद, प्रभाग समितीचे अध्यक्षपद देण्याचे मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांना निवेदन देऊन सत्तेत वाटा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला एक प्रभाग समितीचे अध्यक्षपद आणि विषय समितीचे सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.