Pimpri सरकारी आदेशाला हरताळ फासणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करा – यशवंत भोसले

कामगारांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तु वगळून सर्व दुकाने व मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथील उद्योगधंदे धंदे बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशाला पिंपरी-चिंचवड शहरातील कारखानदारांनी हरताळ फासला आहे. शहरातील अनेक मुजोर कारखानदारांनी आपापले कारखाने चालू ठेवून कामगारांच्या जिवाशी खेळ चालवला आहे. समाज, देश, आरोग्याच्या हितापेक्षा नफेखोरीसाठी कारखाने सुरु ठेवणाऱ्या कारखानदारांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी केली आहे.

याबाबत भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सर्वाधिक रुग्णही याच शहरातील आहेत. त्यामुळे सरकारने 31 मार्चपर्यंत शहरातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर कामगारनगरी आहे. शहरातील टाटा मोटर्स, बजाज, फोर्स मोटर्स, महिंद्रा अॅटलास कॉप्को, अल्फा लावल, सँडविक, मार्शल, इमर्सन, एसकेएफ, केएलबी, फिनोलेक्स, सेंच्युरी एन्का अशा मोठ्या कंपन्या अद्यापही चालू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या पिंपरी-चिंचवड, चाकण, हिंजवडी, पुणे शहर, जिल्ह्यातील सुमारे साडेसहा ते सात हजार छोटे-मोठे कारखाने चालू आहेत.

कारखाने सुरु असल्याने तेथे काम करणारे लाखो कामगार एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. त्यातून कोरोना संसर्गाची दाट शक्यता असल्याची भिती भोसले यांनी व्यक्त केली आहे.

सेंच्युरी एन्का कंपनीने तर कहरच केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. परंतु, सेंच्युरी एन्काच्या व्यवस्थापकाने कारखाना प्रक्रिया उद्योग असल्याचे सांगत रविवारी कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हा कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

या आवाहनास कारखानदारांनी अल्प प्रतिसाद दिला आहे. एका कारखान्याने 50 टक्के कामगारांना ब्लॉक क्लोजर व 50 टक्के कामगार कामावर येतील अशी नोटीस लावून या आदेशाची अमंलबजावणी केली आहे. तर बाकीच्या कारखान्यांमध्ये 100 टक्के उत्पादन चालू ठेवले असूनही तिनही पाळीमध्ये कामगारांना कामावर बोलवत सरकारच्या आदेशाला हरताळ फासला आहे.

त्यामुळे कारखान्यात समूहाने काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाचा प्रादुर्भाव होवू शकतो, हे माहित असूनही समाज, देशाच्या आरोग्याच्या हितापेक्षा नफेखोरी करता ज्या कारखानदारांनी आपले कारखाने चालू ठेवले आहेत. अशा कारखानदारांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी 100 टक्के कारखाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे लेखी आदेश द्यावेत.

कारखान्यातील सर्व कंत्राटी, व कायम कामगारांना 31 मार्चपर्यंतचे पूर्ण वेतन द्यावेत, अशी मागणी भोसले यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे थांबत नाही. तोपर्यंत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये, असे आदेशही द्यावेत, अशी विनंतीही भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.