Pimpri: अभय योजना; चार हजार मिळकतधारकांनी घेतला सवलीताचा लाभ; पाच कोटी सवलत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मिळकतकर थकबाकीदारांसाठी 1 ऑक्टोबर पासून अभय योजनेअंतर्गत मनपाकर शास्ती (दंड) रकमेमध्ये सवलत देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबरपूर्वी 5 हजार 213 मिळकतधारकांनी 21.37 कोटीचा भरणा केला असून त्यापैकी 4 हजार 163 मिळकतधारकांना मनपा कर शास्ती (दंड) रक्कमेमध्ये 5 कोटी 47 लाख इतकी सवलत देण्यात आली आहे. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत कराचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या मनपाकर शास्ती (दंड) रक्कमेच्या 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त व कर संकलन विभागाचे प्रमुख दिलीप गावडे यांनी दिली. मिळकतकर थकबाकीदारांकरिता करसंकलन विभागामार्फत दिनांक 1 ऑक्टोबर 2018 पासून मनपाकर शास्ती (दंड) रक्कममध्ये सवलत देण्याची अभय योजना राबविण्यात येत आहे. 15 ऑक्टोबर 2018 पूर्वी संपूर्ण कराची रक्कम भरणा करणा-या मिळकतधारकांकरिता एकूण मनपा कर शास्ती (दंड) रक्कमेच्या 90 टक्के सवलत देण्यात आलेली आहे.

15 ऑक्टोबर 2018 पूर्वी एकूण 5213 मिळकतधारकांनी 21.37 कोटीचा भरणा केला असून त्यापैकी 4163 मिळकतधारकांना मनपा कर शास्ती (दंड) रक्कमेमध्ये 5 कोटी 47 लाख इतकी सवलत देण्यात आलेली आहे. 16 ऑक्टोबर 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 याकालावधी मध्ये मिळकतकराचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती (दंड) रक्कमेच्या 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच मिळकतकराचा ऑनलाईन पद्धतीने एक रक्कमी भरणा करणा-या मिळकतधारकांकरिता सामान्य करात 2% सुट लागू आहे.

मिळकतधारकांचे सोईच्या दृष्टीने सर्व करसंकलन विभागीय कार्यालयातील कॅश काऊंटर सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहेत. मिळकतधारकांना कराची रक्कम रोख / धनादेश / डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. या शिवाय महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मिळकत कर भरणेकामी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून अभय योजनेची माहिती देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ज्या मिळकतधारकांनी अद्यापही मिळकतकर भरणा केलेला नाही, अशा मिळकतधारकांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराची रक्कम भरणा करुन अभय योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन दिलीप गावडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.