Pimpri: शहरात तीन दिवसात दोन हजार रुणांची नोंद, 453  नवीन रुग्णांची भर

The city recorded two thousand loans in three days, adding 453 new patients : औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या बारा हजार पार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील  कोरोना रुग्ण संख्येतील वाढ सुरुच आहे.   मागील तीन दिवसांत म्हणजेच 19 ते 21 जुलै दरम्यान शहरात तब्बल दोन हजार नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे.  आज (मंगळवारी) सायंकाळी सात वाजेपर्यंत 453  नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या 12 हजार 177 झाली आहे. 10 मार्च ते 21 जुलै या 144 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या बारा हजाराच्या पुढे गेली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.  मागील काही दिवसांपासून दररोज  रुग्ण पॉझिटीव्हचा उच्चांक होत आहेत. शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहेत.

शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दिवसाला पाचशे ते सहाशे जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत.  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारपासून लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये देखील रुग्णवाढीचा आलेख उंचावतच आहेत.

18 जुलै पर्यंत शहरातील रुग्णसंख्या दहा हजार होती. त्यानंतर 19 ते 21 जुलै या अवघ्या तीन दिवसात तब्बल दोन हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.

आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 12 हजार 177 वर पोहोचली आहे. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत  तब्बल 453 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या बारा हजार पार झाली आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ?

कोरोनाने तरुणांना विळखा घातला आहे. 22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 4904 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे.

त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 3467 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 1272 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 1102 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

याशिवाय 60 वर्षापुढील 1422 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

7812 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात, 4138 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी  त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त आहे.

आजपर्यंत 7812 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आजमितीला 4138 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 2197 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे.

तर, 633 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून 289  रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, आजपर्यंत शहरातील 233 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.