Pimpri : केवळ शत्रूचा शत्रू म्हणून एखाद्याशी केलेली मैत्री कधीच टिकत नसते -शरद पोंक्षे

एमपीसी न्यूज – केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात, ती मैत्री कधीच टिकत नाही. ती मैत्री तत्कालिक असते. समान धागे असतील तरच मैत्री टिकते, अशा शब्दांत अभिनेते व सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी बुधवारी (दि. 25) निगडी प्राधिकरण सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले.  भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजप, सावरकर प्रेमी व अमोल थोरात युथ फाऊंडेशनच्या वतीने निगडी प्राधिकरणमध्ये “सावरकर विचार दर्शन” या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

केवळ इलेक्शनच्या सभा भिजत होत नाहीत, तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात, अशी जोरदार फटकेबाजीही त्यांनी केली. सावरकरांचे विचार आचरणात आणले नाहीत म्हणूनच आज देशाची ही अवस्था झाली आहे. लोकशाही राष्ट्रामध्ये एका विशिष्ट मर्यादेपर्यंत अल्पसंख्यांकांना महत्त्व आहे हे आम्हीही मान्य करतो. पण, तेच महत्त्व लक्षात घेऊन राज्यकर्ते शासन करायला लागले तर मात्र त्या देशाचे फक्त वाटोळे होते. ज्या देशातल्या बहुसंख्य माणसांचा अनादर केला जातो ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आण्णाभाऊ साठे अर्थिक महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, भाजप प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, उमा खापरे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व शहर सरचिटणीस अमोल थोरात, नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निगडी, प्राधिकरण येथील खानदेश मित्र मंडळ कार्यालयाच्या मैदानावर आयोजित या व्याख्यानाला सावरकरप्रेमींची गर्दी झाली होती. कार्यक्रमाच्या शेवटी पावसाने हजेरी लावली. विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पावसात भिजत केलेल्या भाषणाचा उल्लेख न करता अभिनेते शरद पोंक्षे यांनी “फक्त इलेक्शनच्या सभा भिजत होत नाहीत, तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात”, अशी टिप्पणी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

सावरकरांवरील विचार मांडताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही अप्रत्यक्षपणे भाष्य केले. केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात, ती मैत्री कधीच टिकत नाही. ती मैत्री तत्कालिक असते. समान धागे असतील तरच मैत्री टिकते, असे ते म्हणाले. तसेच हिंदू हा पटकन जागा होत नाही. त्यांना जागे करण्यासाठी राहुल गांधी यांच्यासारखी माणसे उपयोगी पडतात. त्यांनी महिना दीड महिन्यात अशी विधाने करत राहवीत, असे म्हणत सावकरांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असंख्य गैरसमज पसरवले
शरद पोंक्षे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रीय हिंदुत्वाचा विचार जोपासला. त्यांनी देशाला संपूर्ण स्वातंत्र्याची जाणीव करून दिली. सावरकर हे विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून जगलेले आहेत. सावरकर यांनी जात निर्मूलनासाठी मोठे कार्य केले. जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर सावरकर यांनी त्यांना काही सूचनांचे पत्र पाठविले. देशाची सीमा सुरक्षित करण्यासाठी मजबूत भींत बांधण्याची सूचना केली. परंतु, त्यांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले गेले. सावरकरांविषयी असंख्य गैरसमज पसरवले गेले. सावरकरांना ब्राह्मण या व्याख्येत अडकवून ठेवले.

दुबळ्या माणसांच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही
सर्व जग मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये विभागले गेले आहे. भारत हाच एकमेव हिंदू राष्ट्र आहे. परंतु, हिंदू राष्ट्र म्हटले की आम्ही धर्मांध ठरतो. धर्म समजून न घेतल्याने देशाचे मोठे नुकसान होत आहे. ज्या ज्या देशात जे बहुसंख्य राहतात, ते देश त्या धर्माचे असतात. त्यामुळे भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. देशातील नागरिकांना अहिंसेचे डोस पाजले गेले. रक्ताच्या थेंबाची किंमत आपणाला कळलीच नाही. दुबळ्या माणसांच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. सशस्त्र माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसते, असे पोंक्षे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक व शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले. नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.